अकोला, दि. २0- भाजपाचे उमेदवार विजय अग्रवाल यांनी प्रचार संपल्यानंतरही देवाच्या छायाचित्रांचा आधार घेत सोमवारी फलक लावून प्रचार सुरूच ठेवल्याने त्यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते विजय मालोकार यांनी या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन ही कारवाई केली.भाजपाचे प्रभाग क्रमांक पाचचे उमेदवार विजय अग्रवाल हे महापालिका निवडणूक रिंगणात आहेत. महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार करण्यास, तसेच फलक लावण्यास रविवारी सायंकाळी ६ वाजेनंतर बंदी घालण्यात आली आहे; मात्र त्यानंतरही विजय अग्रवाल यांच्याकडूनच संचालित असलेल्या विजय संकल्प फाउंडेशनच्या नावे अग्रवाल यांचा प्रचार करणारे फलक प्रभाग क्रमांक पाचमधील मोरेश्वर कॉलनी येथे लावण्यात आले आहे. सदर फलकावर भाजपाची निशाणी असलेले कमळही असल्याने या प्रकरणाची तक्रार शिवसेना नेते विजय मालोकार यांनी सोमवारी सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर विजय अग्रवाल यांच्याविरुद्ध शहर विद्रूपीकरण कायद्याच्या कलम ३ आणि ७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान शिवसेना नेते विजय मालोकार यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलतांना सांगीतले की, विजय अग्रवाल यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे; मात्र आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर निवडणूक आयोगाकडेही तक्रार करणार आहे. जाहीर प्रचारास बंदी असतानाही विजय संकल्प या नावाखाली मतदारांना कॅलेंडर वाटप करणे आणि कमळाची निशाणी असलेले फलक लावणे हा मोठा गुन्हा असून, यानुसार क ारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.दरम्यान, विजय अग्रवाल यांनी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेल्या परिसरात विजय संकल्प फाउंडेशनच्या नावाने झळकलेल्या फलकावर एवढा गहजब करण्याचे कारण नसल्याची सबब दिली. या फाउंडेशनचे सदस्य नसून निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक त्रास देण्याचा हा प्रकार दिसून येत असल्याची त्यांनी पुस्ती जोडली. पोलिसांच्या व्हॉट्सअँप क्रमांकावर तक्रारआचारसंहिता भंग करणार्यांची तक्रार करण्यासाठी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी व्हॉट्सअँप क्रमांक दिला आहे. शिवसेना नेते विजय मालोकार यांनी या क्रमांकावरही विजय अग्रवाल यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याची तक्रार केली आहे. पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, त्यानंतर आचारसंहिता भंग प्रकरणाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
भाजपा उमेदवार विजय अग्रवालविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: February 21, 2017 1:55 AM