अकोला - राज्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर आता हळहळू राज्यातील राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत. एकनाथ शिंदेसह 50 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यातच, अनेकजण शिंदेंच्या गटात दाखल होत आहेत. तर दुसरीकडे आता भाजपही सक्रिय झाला आहे. भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदारालाभाजपात घेतले आहे. सातत्याने भाजपवर टिका करणाऱ्या अमोल मिटकरींच्या अकोला येथूनच हे राष्ट्रवादीचे नेते भाजपात गेले आहेत.
भाजपने आता राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला असून बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे 8 दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. सिरस्कार यांनी गेल्या गुरूवारी मुंबईत फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर, आज २० ऑगस्ट रोजी अकोल्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. एकीकडे शिंदे गटात अनेकांचा प्रवेश होत आहे, तर दुसरीकडे आता भाजपमध्येही इनकमिंग सुरू झालं आहे. तर, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी आपला पहिला डाव टाकल्याचं दिसून आलं.
दरम्यान, सिरस्कार हे भारिप बहुजन महासंघाकडून अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघात १० वर्षे आमदार राहिले होते. त्यानतंर त्यांनी २०१९ मध्ये माजी आमदार हरिदास भदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. वंचित बहुजन आघाडीतून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला होता. मात्र, राष्ट्रवादी प्रवेशाच्या एका वर्षानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळताच त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे.