लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्रातील भाजप सरकार असो वा काँग्रेस पक्ष यांनी भांडवलदारांचे मांडलिकत्व स्वीकारल्यामुळे देशातील १0 टक्के लोकांकडे ९0 टक्के संपत्ती केंद्रित झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. सरकार मूठभर उद्योगपतींना पाठीशी घालत असल्यामुळे या देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात आम आदमी पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला असून, केंद्र तसेच राज्य सरकारच्या तुघलकी निर्णयांमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘आप’चा सशक्त पर्याय असल्याची माहिती ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी दिली. देशातील बड्या उद्योग समूहांनी लोकशाहीचे अपहरण केले आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या घडीला भांडवलदारांचे मांडलिक झाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकारला लोककल्याणाचा विसर पडला असून, ‘मेक इन इंडिया नव्हे, तर फेक इन इंडिया’मुळे भविष्यात देशात बेरोजगारीचे संकट निर्माण होणार असल्याचे सुधीर सावंत यांनी स्पष्ट केले. आम आदमी पक्षाने दिल्लीत सत्ता स्थापन करून त्या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासह विकास कामांच्या योजना निकाली काढण्यात यश मिळवले आहे. पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे काम पाहूनच ‘आप’मध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे ब्रिगेडिअर सावंत यांनी सांगितले. केंद्रातील भाजप सरकार, विरोधी पक्ष काँग्रेस यांचा जातीय दंगली घडविणे हाच अजेंडा आहे. दोन्ही पक्षांची भूमिका पाहता सर्वसामान्य जनतेसमोर आम आदमी पक्षाचा पर्याय खुला आहे. त्यासाठी राज्यात आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत पक्षाची विधानसभा मतदारसंघनिहाय संघटनात्मक बांधणी केली जाणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला सदानंद पवार, केतन देसाई, राहुल चव्हाण, कमांडर आलिम पटेल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शरद पवारांमुळेच शेतकरी संकटातराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच राज्यातील शेतकरी देशोधडीला लागल्याचा आरोप ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केला. शरद पवार या देशाचे कृषिमंत्री होते. मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील शेतकरी व शेती उत्पादित मालाला हमीभाव देण्यासाठी कोणत्याही प्रभावी उपाय योजना केल्या नाहीत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी न करता पवार यांनी शेतकर्यांना संकटात ढकलल्याचे ब्रिगेडिअर सावंत यांनी सांगितले.
भाजप-काँग्रेस भांडवलदारांचे मांडलिक : ‘आप’चे ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांचा पत्रकार परिषदेत आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 1:10 AM