अकोट(अकोला) : केंद्रात व राज्यात भाजप - सेनेचे सरकार आहे. या सरकारने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नाही. जनतेची फसवणूक केली. या सरकारला शेतकरी, युवक, व्यापारी सर्वच कंटाळल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र आणून सत्ता स्थापन करणार, सहा महिन्यानंतर आपलेच सरकार येणार आहे, त्यामुळे आगामी निवडणूकीत अब की बार, बस कर यार ! असा नारा महाराष्टÑ काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला. गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देउन नविन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे सुतोवाच यावेळी अशोक चव्हाण यांनी केले. अकोट येथे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रे दरम्यान स्थानिक खरेदी विक्री मैदानात सभा पार पडली. यावेळी चव्हाण बोलत होते.अशोक चव्हाण यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना मदत तर नाहीच परंतु जीएसटीचा कायदाही शेतकºयांकरिता डोकेदुखी ठरला आहे. व्यापाºयांना वर्षात ३६ रिटर्न भरावे लागत आहेत. राज्यात हे सरकार आल्यापासून ११ हजाराच्या वर शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. तर देशात ५० हजाराच्यावर हा आकडा गेला आहे,असेही चव्हाण यांनी सांगितले.
पंधरा लाख कुठे गेले- विखे पाटीलविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या ठिकाणी भाजपचे पालकमंत्री, आमदार असतांनाही शेगावपासून अकोट या रस्त्याची दुर्दशा पाहता या भागातील रस्त्यांमुळे आजारात वाढ झाली आहे. विकासात वाढ झाल्याचे मात्र कुठे चित्र दिसत नाही. भाजपाने सर्वसामान्य नागरिकांना १५ लाख रुपये प्रत्यकाच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात कोणाच्याही खात्यात एक रुपया आला नाही, उलट नोटांचे रंग बदलले, शेतकºयांना सरसगट कर्जमाफी नाही, विविध प्रकारच्या योजनेचा लाभ नाही. पंधरा लाख कुठे गेले, असा प्रश्नही विखे पाटील यांनी उपस्थित केला. विदेशात पळुन जाणाºया व पैसे बुडविणाºया उद्योजकांना मदत केल्याचा आरोप त्यांनी केला. दुष्काळाकरिता पुरेसा पैसा दिलाच नाही, अशा स्थितीत अकोट तालुकाही दुष्काळग्रस्त घोषीत करायला पाहिजे होता असे सांगितले.