-संजय खांडेकर
अकोला : भाजप सरकार मुस्लिम विरोधी असल्याची काँग्रेसने गैरसमजूत केली आहे. सरकारचे धोरण सर्व समाजाच्या उत्थानासाठी आहे, हे आता मुस्लिमांना देखिल समजत आहे. मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेचे विष पसरवून त्यांच्या वोट बँकेचा सत्तेसाठी वापर केला आहे.असे मत राज्य हज कमेटीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी व्यक्त केले. एका कार्यक्रमासाठी ते नुकताच अकोल्यात येऊन गेले, तेंव्हा लोकमने त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद.
प्रश्न : मुस्लिमांच्या सर्वांगी विकासासाठी बसविण्यात आलेल्या सच्चर कमेटीच्या अंमलबजावणीसाठी भाजप पुढाकार घेत नाही का?
उत्तर : सच्चर कमेटी आणि त्यातील सुधारणा ह्या काँग्रेसच्याच आहे. काँग्रेसनेच अन्याय केला अन काँग्रेसनेच कमेटी नेमली. मुस्लिमांची दिशाभूल करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. पंडित दिनदयाल अंत्योदय योजना ही संपूर्ण पथदलितांच्या विकासासाठी अंमलात आणली जात आहे. मुस्लिम समाज अज्ञानी आणि गरीब असल्याने त्यांना या योजनेचा लाभ होत आहे. त्यासाठी काँग्रेसच्या सच्चर सारख्या रिपोर्टकार्डची आवश्यकता नाही.
प्रश्न : ट्रीपल तलाकप्रकरणी धोरणास अनेक मुस्लिम संघटनांचा विरोध आहे, तुमचे मत काय?
उत्तर : ट्रीपल तलाकप्रकरणी सरकारचे आणि सुधारणावादी मुस्लिमांचे धोरण शुध्द आणि स्पष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. त्यामुळे मुस्लिम भगिणींवर होणारा अन्याय दूर होण्यास मदत होईल. काही संघटना त्या धोरणास विरोध करीत आहे, ते चुकीचे आहे.
प्रश्न : काश्मीरप्रकरणी भादंवि ३७० कलम रद्द झाल्यास कुणाला लाभ मिळेल?
उत्तर : भारत सेक्युलर राष्ट्र आहे. तर दुसरीकडे काश्मीरमध्ये कायदा गोठविला गेला आहे. जर भादंवि ३७० कलम रद्द करण्यात आले तर भारतीयांना त्याचा लाभ होईल. देशभरातील मुस्लिमांनाच नव्हे तर कुणालाही काश्मीरमध्ये जमीन-‘घर घेऊन व्यापार करता येईल. भाजपच्या कार्यकाळात हे कलम रद्द होईल यात शंका नाही.
प्रश्न : लोकसंख्या नियंत्रणासाठी तीन अपत्यांवर असलेल्यांचे अधिकार गोठविण्याचे विधेयक येत आहे, त्याला तुमची संमती आहे का?
उत्तर : जास्त अपत्यांचा मुद्दा मुस्लिमांच्या अज्ञानाशी जुळलेला आहे. सुशिक्षीत मुस्लिम कधीच त्याचे समर्थन करणार नाही. लोकसंख्या नियंत्रणासाठी असे विधेयक येत असेल तर ते केवळ मुस्लिमांसाठी नाही तर सर्व भारतीयांसाठी स्वागतार्ह ठरेल. त्यामुळे मुस्लिमांचा विकास दर उंचावेल. मुस्लिमांमधील असुरक्षीततेची भावना भाजप कमी करण्याचे प्रयत्न करीत आहे.