ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 11 - केंद्रात व राज्यात सत्तेमध्ये आलेले भाजपा सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या विरोधातील सरकार आहे. या सरकारमध्ये सामान्यांचे भले होत नाही, मात्र गुंडांना चांगले दिवस आलेत. असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.
काँग्रेसच्या काळात सरकारमध्ये मदत व पुनर्वसन खाते होते, भाजपाच्या काळात हेच खाते गुंडांसाठी मदत व पुनर्वसन असे झाले असून, हे सरकार केवळ गुंडांचे पुनर्वसन करणारे सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ स्थानिक स्वराज्य भवन मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी मंत्री नसीम खान, डॉ. नितीन राऊत, आमदार भाई जगताप, महानगराध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी आदी उपस्थित होते.
या सरकारचे मंत्री गुंडांची स्तुती करतात. त्यांना आधी पक्षात घेऊ, निवडून आणू व मग सुधरवणार, अशी भाषा करतात. केवळ गुंडांचे पुनर्वसन हाच या सरकारचा अजेंडा असल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला. काँग्रेसच्या काळात ज्या योजना राबवल्या गेल्या, त्याच योजनांची नावे बदलून हे सरकार काम करीत आहे.
एकही नवी योजना सुरू केली नाही. ज्या चांगल्या योजना होत्या, त्या बंद पाडल्या. मुस्लीम, मराठा आरक्षणावर निर्णय घेतला नाही. शेतक-यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत, उलट भाजपा सरकारमध्ये त्या वाढल्या. त्यामुळे येणा-या काळात भाजपाला सत्तेतून घालवण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी मंत्री नसीम खान यांनी महापालिकेचे निकाल हे राजकारणाची दिशा बदलवणारे निकाल असतील, असा आशावाद व्यक्त केला.
राजीनामा देणार पण तारीख नाही सांगणार
भाजपासोबत सत्तेमध्ये असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना कोणी विचारत नाही, राजीनामा खिशात असल्याच्या वल्गना हे मंत्री करतात. हा प्रकार म्हणजे ‘मंदिर वही बनायेंगे पर तारीख नही बतायेंगे’ याच धर्तीवर ‘इस्तीफा जरूर देगें पर तारीख नही बतायेंगे’ असाच आहे असा आरोप चव्हाण यांनी केला. चव्हाण यांनी भाजपा-सेनेवर तोंडसुख घेतांना राष्ट्रवादीवर टीका करणे मात्र टाळले.