अकोला : लोकसभा निवडणुकीत राज्यात अनेक मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराजय झाला. विदर्भात तर भाजपला केवळ दोनच जागा मिळाल्या. आगामी विधानसभा, महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजप तयारीला लागली असून, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत. त्यांचे काय मत आहे ? हे जाणून घेण्यासाठी प्रदेश निरीक्षक म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉ. भागवत कराड २० जूनला बुधवारी भाजप कार्यालय आळशी संकुल येथे सकाळी १० वाजता बैठक घेणार आहेत.
भारतीय जनता पक्षाचे आणि पराजय-जय याविषयी मंथन-चिंतन आणि भविष्यातील वाटचालीसंदर्भात कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याची परंपरा सातत्याने भारतीय जनता पक्षात असून, या दृष्टीने प्रदेश स्तरावर ३५ जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे निरीक्षक ४८ लोकसभा मतदारसंघांत पाठविण्यात येत आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना विजय मिळाला असला तरी, भाजपच्या टक्केवारीत मोठी घसरण झाली आहे. ही भाजपच्या दृष्टिकोनातून चिंतेची बाब आहे.
अकोला पश्चिम विधानसभा व बाळापूर विधानसभा मतदारसंघांत भाजप १० ते १५ हजार मतांनी पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही मतांची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यासाठी प्रदेश निरीक्षक माजी केंद्रीय मंत्री खासदार भागवत कराड अकोल्यात येऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन संवाद साधणार आहे.