मुंबई/अकाेला : अकाेला, वाशीम, बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालात नवीन विक्रम घडला आहे. भाजपाचे वसंत खंडेलवाल यांनी तब्बल तिन वेळा विजयी झालेल्या शिवसेनेच्या गाेपीकिशन बाजाेरिया यांचा १०९ मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. खंडेलवाल यांच्या विजयात महाविकास आघाडीचे फुटलेली मते माेलाची ठरली आहेत. खंडेलवाल यांना ४४३ तर बाजाेरिया यांना ३४३ मतं मिळाली. तर ३१ मतं अवैध ठरली.
खंडेलवाल यांचा विजय या मतदारसंघासाठी नव्या विक्रमाची नाेंद करणारा ठरला आहे. हा मतदारसंघ १९८८ पासून गेली चार टर्म शिवसेनेच्या ताब्यात हाेता तर शिवसेनेचे उमेदवार गाेपीकिशन बाजाेरिया यांची तिसरी टर्म सुरू हाेती. त्यामुळे बाजाेरिया व शिवसेना यांचा सलग विजयाच्या नव्या विक्रमाला खंडित करत भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी विजयाचे कमळ फुलविले तसेच बाजाेरिया यांच्यासारख्या दिग्गजाला पराभूत करण्याच्या विक्रमाची नाेंद हाेईल.
अकोल्यात भाजपाचा विजय झाल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे सुपूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. बहुमत असून पण शिवसेना उमेदवाराचा दारूण पराभव झाला. मित्रपक्षांनी दगा दिला आणि म्हणे २५ वर्षे आम्ही युतीमध्ये सडलो. कोण कोणाला सडवतोय आता उद्धव ठाकरेंना कळलं असेल, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्षातच कायम धुसफूस आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा देत, या आधीच स्थानिक स्तरावर वेगळी चूल मांडली हाेती. दुसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेसचा याच मतदारसंघात सलग चौथ्यांदा पराभव झाला हाेता त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसही आपल्या घडयाळाचे काटे काेणत्या दिशेने फिरवेल यांची शंका हाेती. या साेबतच शिवसेनेतच अंतर्गत गटबाजी चांगलीच जाेर धरली आहे. या गटबाजीचाही फटका शिवसेनेला बसला. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांची मते फुटल्याचे निकाल स्पष्टपणे दर्शवत आहे.