अकोला : राज्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचा दावा करीत घाई घाईत शपथविधी उरकणे हे अचानक घडलेले नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची घेतली, तेव्हाच हे सर्व शिजले होते. आपण तसा इशाराही दिला होता, अशी प्रतिक्रीया वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी व्यक्त केली.राज्यात सत्ता स्थापनेचा तीढा सुटत असताना आणि महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा फॉर्म्यूला निश्चित झाला असतानाच, शनिवारी सकाळीच भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा केला. एवढेच नव्हे, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधीही उरकण्यात आला. या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले, की ही घडामोड अचानक झालेली नाही. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली. तेव्हाच असे काही तरी होणार याचा आपल्याला अंदाज आला होता. सत्तास्थापनेत शिवसेनेचा पोपट होऊ शकतो, असा इशाराही आपण दिला होता. परंतु, राजकारणातील चातुर्य कमी पडल्याने त्यांची फसवणूक झाली, असे आंबेडकर म्हणाले.राज्यपालांचे काम घटनेला धरून नाहीदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी सकाळीच उरकण्यात आला. राज्यपालांनी घाईघाईत हा शपथविधी केला. हे काम घटनेला धरून नाही. लोकांना विश्वासात घेऊन शपथविधीची पूर्वकल्पना द्यायला हवी होती. राज्यपालांकडून लोकांना विश्वासात न घेता कारभार झाला, असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.
भाजप-राष्ट्रवादीने सत्तेसाठी एकत्र येणे पूर्वनियोजीतच होते - प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:37 PM