तेल्हारा: आमदार प्रकाश भारसाकळे यांना अकोट मतदारसंघात पक्षातूनच विरोध सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात अकोटमध्ये झालेल्या बैठकीनंतर रविवारी तेल्हाºयात झालेल्या भाजपच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्थानिक उमदेवार देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. त्या संबंधितचे निवेदन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पाठविण्यात आले आहे.अकोट विधानसभा मतदारसंघासाठी आगामी निवडणूकीकरिता स्थानिक उमेदवार द्या, अशी मागणी भाजपामधूनच होत आहे. त्याची सुरुवात अकोट येथे गेल्या आठवडयात भाजपच्याच बैठकीमध्ये झाली व त्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांना अशा मागणीचे निवेदन ही देण्यात आले. भारसाकळे यांना होणाºया विरोधाचे लोण आता मतदारसंघात सर्वदूर पोहचत आहे. तेल्हारा येथे रविवारी भागवत मंगल कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भाजपचे पदाधिकारी, बुथप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोट मतदारसंघात आजपर्यंत विधानसभेकरिता, लोकसभेकरिता ज्यांना पक्षाने उमेदवारी दिली त्यांना विजयी करण्याकरिता तेल्हारा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. गतवेळीसुद्धा इतर पक्षातून व अमरावती जिल्ह्यातून आलेले प्रकाश भारसाकळे यांना पक्षाने ऐनवेळेवर उमेदवारी दिली. तरीही तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याने त्यांना विजयी केले; पण आ. प्रकाश भरसाकळे हे पदाधिकारी, बुथप्रमुख व कार्यकर्ते यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत. तसेच ज्येष्ठ नेत्यांशी त्यांची वागणूक योग्य नाही. त्यामुळे अकोट मतदारसंघातील जो उमेदवार जन्माने व कर्माने स्थानिक आहे, त्यालाच उमेदवारी द्या, असा बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसेच बैठकीत ठरलेल्या निर्णयाबाबतचे निवेदन केंद्रीय राज्यमंत्री खा. संजय धोत्रे यांच्या नावाने पाठविण्यात आले असून, प्रतिलिपी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह इतरांनाही पाठविण्यात आले. या निवेदनावर शंकरराव पुंडकर, डॉ. बाबुराव शेळके, बाळकृष्ण नेरकर, लखन राजनकर, राहुल झापर्डे, प्रकाश विखे, संदीप गावंडे, श्रीकांत भारसाकळे, शे. जाकीर शे. हुसेन, शुभम नागपुरे, अशोक नराजे, सुदेश शेळके, सदानंद खारोडे, एकनाथ ताथोड, पुंजाजी मानकर, स्मिता राजनकर, सुनील चहाजगुणे, गजानन गायकवाड, सतीश जयस्वाल, सुनील राठोड, नरेश गंभीरे,मंगेश सोळंके, घनश्याम ढाले, प्रफुल्ल उंबरकार, राजाभाऊ टोहरे, अ. अतीक, शे. रफीक शे. कुरेशी,राजा कुरेशी, वासुदेव खुमकर, कुलदीप तिव्हाणे, डॉ. रमेश जयस्वाल, टोलूसेठ गोयनका, सुनील भुजबले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती तर अनेकांच्या स्वाक्षरी आहेत. (तालुका प्रतिनिधी)