वाशिम : रिसोड मतदार संघावर डोळा ठेवून शिवसंग्रामने सुरू केलेल्या मोर्चेबांधणीमुळे जिल्ह्यातील राजकारण तापायला प्रारंभ झाला आहे. १२ सप्टेंबरला शिरपूर जैन मध्ये पार पडलेल्या शिवसंग्रामच्या कार्यकर्ता मेळाव्यामुळे तर भारतीय जनता पक्षाच्या पोटात गुदगुदल्या होत आहेत. महायुतीमध्ये रिसोड मतदार संघ भारतीय जनता पक्षाच्या वाट्यावर आहे. मात्र माजी केंद्रीय ग्रामिण विकास मंत्री तथा भाजपाचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी हा मतदार संघ शिवसंग्रामसाठी सोडण्याचा शब्द दिल्याचा गवगवा करून शिवसंग्रामने या मतदार संघावर दावा सांगितला आहे. एवढेच नव्हेतर या मतदार संघात शिवसंग्रामच्या इच्छूकांनी छूपछूपके सुरू केलेल्या प्रचारामुळे भारतीय जनता पक्षाच्या इच्छूकांचे ब्लड प्रेशर वाढविले आहे. भारतीय जनता पक्ष- शिवसेना-शिवसंग्राम- रिपाइं- स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्षाच्या महायुतीमध्ये रिसोड व वाशिम हे दोन मतदार संघ भार तीय जनता पक्षाच्या तर शिवसेना हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्यावर आहे. यापैकी रिसोड मतदार संघावर शिवसंग्रामने दावा केला आहे. या मतदार संघात समाविष्ट असलेल्या मालेगाव व रिसोड तालुक्यात पक्षाचे चांगले नेटवर्क असल्यामुळे हा मतदार संघ शिवसंग्रामसाठी सोडण्यात यावा असा आग्रह शिवसंग्रामचा आहे. मात्र, भार तीय जनता पक्ष हा दावा मानायला तयार नाही. गत लोकसभा निवडणूकीत रिसोड विधानसभा मतदार संघाने भारतीय जनता पक्षाला बळ दिले होते. भाजपाचे उमेदवार संजय धोत्रे यांनी या मतदार संघातून घसघसीत आघाडी घेतली होती.
शिवसंग्रामच्या मेळाव्याने भाजपला गुदगुल्या!
By admin | Published: September 13, 2014 11:06 PM