अकाेला: इंदिरा गांधी यांनी देशावर जाहीरपणे आणीबाणी लादली हाेती; मात्र सध्या देशात छुप्या पद्धतीने आणीबाणी असल्याचा आराेप राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार फाैजिया खान यांनी केला. स्थानिक विश्राम भवन येथे आयाेजित पत्रकार परिषदेत त्या बाेलत हाेत्या. त्या म्हणाल्या की त्यावेळी काॅंग्रेसने लावलेली आणीबाणी ही चूक हाेती व नंतरच्या काळात जनतेने काॅंग्रेसला सत्तेबाहेर ठेवले; मात्र काॅंग्रेसने आपली चूक सुधारून माफीही मागितली हाेती. त्यामुळे त्यांच्या दुरुस्त चुकांचा विचार करून जनतेने त्यांना पुन्हा सत्तेत आणले; मात्र भाजपाला आम्ही चांगले काम करत असल्याचा गर्व आहे. त्यांचा कारभार हा आणीबाणीसारखाच असल्याचे मत खान यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारने देशात हुकूमशाहीची स्थिती निर्माण केली आहे. कुठल्याही प्रश्नावर विराेधाचा आवाज दाबला जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे सरकार सपशेल अपयशी ठरले असून, या भाजप सरकारच्या काळात लाेकशाहीचे अवमूल्यन झाले आहे, असा आराेप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर या सरकारने देशाची काेंडी केली आहे. सर्व देशात कृषी कायद्यांना विराेध आहे; मात्र हे सरकार हा विराेध ऐकण्यास तयार नाही. दिल्लीत आंदाेलन करत असलेल्या शेतकऱ्यांवर दडपण आणण्यासाठी अनेक मार्ग त्यांनी अवलंबले; मात्र आता सर्व देश शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, राष्ट्रवादी काॅंग्रेसही शेतकरी आंदाेलनाला सक्रिय पाठिंबा देत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अमाेल मिटकरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, डाॅ. आशा मिरगे, राजू मूलचंदाणी आदी उपस्थित हाेते.