महावितरण कंपनीकडून ग्राहकांची प्रचंड लूट सुरू आहे. बिलावरील स्थिर आकार, वहन आकार, वीज शुल्क आणि वीज विक्री कर या नावाने प्रत्येक बिलावर ६८७ रुपये अतिरिक्त घेण्यात येत असून, वीज आकारापेक्षा अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत आहे.
कमर्शियल वीज २० रु प्रति युनिट तर घरगुती वीज १५.३० रुपये दराने असून, लॉकडाऊनमध्ये हे युनिट पूर्णपणे बंद होते, तरीही स्थिर आकाराच्या नावावर हजारो रुपये ग्राहकांकडून उकळण्यात आले आहे. मागील वर्षी महाविकास आघाडी सरकारने विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीज मोफत देण्याचे जाहीर केले होते. लॉकडाऊन काळातील घरगुती व कृषिपंपाची मिळालेली बिले अवाजवी असून, दुरुस्ती करून द्यावी. लॉकडाऊन काळात व्यवसायिक, उद्योजक, व्यापारी यांची प्रतिष्ठाने बंद असूनही दिलेली अव्वाच्या सव्वा वीजबिले, वीजपुरवठा खंडित न करता, वीजबिल भरून न घेता, दुरुस्ती करून देण्याची धडक मोहीम राबवावी.
वीज ग्राहकांना वीजबिल माफी करावी. थकबाकी वसुलीची व वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश मागे घेऊन शेतकरी, तसेच घरगुती वीजधारकांचा खंडित केलेला वीजपुरवठा त्वरित जोडून द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, हर्षल साबळे, प्रमोद टाले, अविनाश यावले, जय तायडे, अखिल भटकर, अविनाश साबळे, चैतन्य दुबे, नितीन मुगल व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.