अकोट : तालुक्यातील कुटासा पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचे अर्जुनसिंग सोळंके हे ८९0 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले, तर भारिप बमसंचे उमेदवार सुभाष सोनोने यांना १६९३ मतांवर समाधान मानावे लागले. अकोट पंचायत समिती अंतर्गत कुटासा सर्कलच्या रिक्त झालेल्या जागेकरिता १९ एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात आली. एकूण ११ मतदान केंद्रांवर १0 हजार २२ मतदारांपैकी ५ हजार २९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्याची मतमोजणी अकोट पंचायत समितीच्या सभागृहात २१ एप्रिल रोजी पार पडली. त्यामध्ये भाजपाचे अर्जुनसिंग विजयसिंग सोळंके २५८३ मते घेऊन विजयी झाले, तर भारिप-बमसंचे सुभाष हरिचंद्र सोनोने यांना १६९३, शिवसेनेचे सुजेश डिगांबर चव्हाण यांना ६९0 मते मिळाली. या निवडणुकीमध्ये ६१ मतदारांनी नोटाचा वापर केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार विश्वनाथ घुगे, तर सहायक म्हणून नायब तहसीलदार राजेश गुरव यांनी काम पाहिले. या सर्कलमध्ये भाजप व शिवसेनेचे स्वतंत्र उमेदवार उभे होते, तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला नाही. शिवाय, भारिप-बमसंचा प्रभाव या मतदारसंघात प्रारंभीपासूनच आहे. अशा स्थितीत खासदार संजय धोत्रे यांनी या निवडणूकीचे आव्हान स्विकारत जोरदार मोर्चेबांधणी केली. खा. धोत्रे यांनी प्रचाराचा धडाका व गाठीभेठी घेऊन भाजपाच्या विजयाचा पाया रचला त्यामुळे भाजपाने या मतदारसंघात मारलेली मुसंडी राजकीय वतरुळात चर्चेचा विषय ठरला आहे. सोळंके यांच्या नावाची घोषणा होताच भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.
पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे अर्जुनसिंग सोळंके विजयी
By admin | Published: April 22, 2017 1:17 AM