अकाेला: महापालिकेत स्थानिक राजकारण्यांचा अवाजवी हस्तक्षेप पाहता मनपात नियुक्तीसाठी शासन स्तरावरून वरिष्ठ अधिकारी नकार देत असल्याची माहिती आहे. याचा परिणाम सत्ताधारी भाजपने मार्गी लावलेल्या विकास कामांवर हाेत असून, कंत्राटदारांच्या काेट्यवधी रुपये देयकांच्या फायली बाजूला सारण्यात आल्याची माहिती आहे. मुख्य लेखा परिक्षक, मुख्यलेखाधिकारी आदी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ही बाब पाहता या दाेन्ही अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी सत्तापक्ष भाजपने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आ. नितीन देशमुख यांच्याकडे शासनदरबारी पाठपुरावा करण्याची मागणी केल्याची माहिती आहे.
महापालिकेतील रिक्त पदांचा अनुशेष अद्यापपर्यंतही कायमच असल्याची परिस्थिती आहे. रिक्त पदांमध्ये मुख्य लेखापरीक्षक, मुख्य लेखाधिकारी, उपायुक्तांच्या दाेन्ही पदांचा समावेश असून, या व्यतिरिक्त सहायक संचालक नगररचना, नगररचनाकार, सहायक नगररचनाकार, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता जलप्रदाय विभाग यांसह विविध पदांचा समावेश आहे. मनपातील महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे सहायक आयुक्त वैभव आवारे, सहायक आयुक्त पुनम कळंबे यांच्यासह स्थानिक कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवून प्रशासकीय कामकाज निकाली काढताना आयुक्त संजय कापडणीस यांची दमछाक होत आहे. परिणामी, काेट्यवधींच्या थकीत देयकांच्या फायली संकटात सापडल्या आहेत.
सेनेच्या माध्यमातून पाठपुरावा
मुख्य लेखापरिक्षक पद रिक्त असून, या पदाचा प्रभार जे. एस. मानमोठे यांच्याकडे असून, मुख्य लेखाधिकारी मनजित गोरेगावकर यांची शासनाने जिल्हा कोषागार कार्यालयात बदली केल्यामुळे सदर पदही रिक्त झाले आहे. यामुळे मनपाच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आल्याचे पाहून सत्तापक्ष भाजपने सेनेचे आ.नितीन देशमुख यांच्या माध्यमातून नगरविकास विभागात अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे.