- राजेशशेगोकार
अकोला : अकोल्याच्या राजकीय सारीपाटावर अतिशय प्रबळ असलेल्या भाजपामध्ये अंतर्गत कलहामुळे महायुतीच्या सत्ताकाळातच दोन गट पडले. खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वातील एक गटाने भाजपाची सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवली तर दुसरीकडे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या किचन कॅबिनेटचे सदस्य असतानाही डॉ. रणजित पाटील यांना भाजपात एकाकी पाडण्यात खासदार गट यशस्वी झाला. आता राज्यात भाजपाची सत्ता नाही, अशा काळातही भाजपातील दोन गटांमधील अंतर कमी झाले नसल्याचे चित्र परवा दृष्टीस आले. माजी राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे अपूर्ण काम पूर्ण करून, मनुष्यबळाच्या वेतनासाठी तरतूद करण्याच्या मागणीसाठी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या आंदोलनाकडे त्यांचे काही समर्थक वगळले तर इतर भाजपाच्या नेते व पदाधिकाºयांनी चक्क पाठ फिरविल्याचे दिसून आले. असा प्रकार काही पहिल्यांदाच झालेला नाही. यापूर्वीही अनेक आंदोलने व कार्यक्रमांमध्ये भाजपामधील दोन गट स्वतंत्र कार्यरत दिसले आहेत; मात्र सत्ता गेल्यावर हे दोन्ही गट एकत्र येतील ही शक्यता उरलीच नसल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले. खरे तर अकोल्याच्या भाजपावर ना. धोत्रे यांचे एकहाती वर्चस्व आहे. त्यांच्या नेतृत्वात आ. रणधीर सावरकर यांनी आपल्या मतदारसंघाबाहेर कार्यविस्तार आधीच वाढविला होता. आता जिल्हाध्यक्ष पदामुळे या विस्ताराला अधिकार मिळाला आहे. त्यामुळे भाजपाचे पक्ष म्हणून जे आंदोलने जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात झाले त्यामध्ये डॉ. पाटील व त्यांचे समर्थक दिसले नाहीत. तोच कित्ता डॉ. पाटील यांच्या धरणे आंदोलनात गिरविला गेला.
सुपर स्पेशालिटी व पोलीस आयुक्त कार्यालयासाठी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली; मात्र संपूर्ण कार्यकाळात या दोन्ही योजना पूर्णत्वास जाऊ शकल्या नाहीत. त्यांनी ठरविले असते तर त्यांच्या कार्यकाळातच हे रुग्णालय कार्यान्वित होऊ शकले असते. राज्याचे गृहराज्यमंत्री पद असतानाही त्यांनीच घोषणा केलेल्या पोलीस आयुक्तालयालाही मुहूर्त मिळाला नाही. उलट अकोल्याच्या नंतर घोषणा झालेली आयुक्तालये त्यांच्याच उपस्थितीत सुरू झाले हे वास्तव नाकारता येणार नाही. या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने का होईना डॉ. पाटील यांनी रस्त्यावर उतरून आपला गट कार्यान्वित ठेवण्यात यश मिळविले आहेच.
आता फक्त कार्यकर्ते सांभाळण्याचीही कसरत त्यांना करावी लागणार आहे. कारण एका गटाचा कार्यकर्ता दुसरीकडे दिसला की त्याचे काय होते, हे मनपा निवडणुकीच्या तिकीट वाटपात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच अनुभवले आहे. भाजपातील दोन गटांमधील दुरावा हा संपेल तेव्हा संपेल; मात्र या निमित्ताने डॉ. पाटील यांनी लावून धरलेला मुद्दा राजकीय नजरेतून न पाहता शहराच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचाच आहे. कोरोनाचा उद्रेक सुरू होताच जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींनी सुपरस्पेशालिटी सुरू करण्याबाबत थेट मुख्यमंत्र्यापर्यंत धाव घेतली होती. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही अकोल्यात येऊन हे रुग्णालय सुरू व्हावे अशी भूमिका पत्रपरिषदेत मांडली होती. त्यामुळे या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने तरी याची दखल शासनाने घेतली तर उत्तमच आहे. श्रेय कोणीही घेऊ द्या, फक्त सुपरस्पेशालिटी सुरू होऊ द्या, ही सामान्यांची भावना आहे.