अकोला, दि. २३- महापालिका निवडणुकीत युतीचे घोंगडे फेकून देत प्रथमच स्वबळावर रिंगणात उतरलेल्या भारतीय जनता पार्टीने ८0 जागांपैकी तब्बल ४८ जागा जिंकत विक्रमी विजय नोंदविला. महापालिकेत बहुमताचा आकडा पार करीत, भाजपने अकोला महापालिकेत नव्या राजकीय पर्वाला प्रारंभ केला.निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासूनच या निवडणुकीचे सूत्रे हाती घेत खासदार संजय धोत्रे यांनी आखलेली रणनीती व या रणनीतीला आमदार गोवर्धन शर्मा आणि आमदार रणधीर सावरकर यांच्यासह भाजपाच्या पदाधिकार्यांनी दिलेली सर्मथ साथ, हे या विजयाचे वैशिष्ट्ये ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षातील विद्यमान नगरसेवकांना आपल्या पक्षात ओढून जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांनी घड्याळाचा गजर वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यातच माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्याने राष्ट्रवादीने मोठी हवा निर्माण केली; प्रत्यक्षात मात्र या हवेला मतदारांनी भीक घातली नाही. शिवसेनेनेही जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्यासह दोन शहरप्रमुखांची नियुक्ती करून सेनेची दमदार फळी रिंगणात उतरविली; मात्र गेल्यावेळी युतीमध्ये सेनेला मिळालेल्या आठ जागांचा आकडा यावेळीही कायम राहिला. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसमधील सुरू झालेले आउटगोइंग थेट अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत सुरू होते. अंतर्गत गटबाजी व महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या प्रती असलेला असंतोष, अशा वातावरणात काँग्रेसला केवळ परंपरागत मुस्लीम मतांच्या पट्ट्यामध्ये यश मिळाले. भारिप-बमसंने संपूर्ण राज्याला ह्यअकोला पॅर्टनह्ण दिला; मात्र त्याच अकोल्यात भारिपची पूर्ण वाताहत झाल्याचे चित्र आहे. अँड. प्रकाश आंबेडकर यांनी थेट ह्यकॉर्नर मीटिंगह्ण घेत प्रचाराची धुरा सांभाळली; मात्र गेल्यावेळच्या जागाही या पक्षाला जिंकता आलेल्या नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळी खातेही उघडता आले नाही.
अकोला महापालिकेत भाजपाचा एकहाती विजय
By admin | Published: February 24, 2017 2:10 AM