अकोला: लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या पहिल्याच सभेत खासदार संजय धोत्रे यांनी जिल्हा परिषदेवर हल्लाबोल करीत ‘नवी पाइपलाइन’ टाकण्याची भाषा केली होती. या जिल्हा परिषदेवर भारिप-बमसंची सत्ता असून, भारिपचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांना लक्ष्य कारण्यासाठी धोत्रेंनी जिल्हा परिषद निवडणुकीचे आव्हान प्रचारातच दिले होते. त्यामुळे आतापर्यंत भाजपाचा झेंडा न फडकलेल्या अकोल्यातील एकमेव अशा स्थानिक स्वराज्य संस्थेला ताब्यात घेण्यासाठी भाजपासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची ठरणार आहे.भाजपाचे जिल्हा परिषदेसाठी ‘३५ प्लस’ हे मिशन ठरविल्याची यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद निवडणुकीची रणनीती तयार झाली असून, प्रत्येक सर्कलनिहाय जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून भाजपाला जिल्हा परिषद ताब्यात घेता आली नाही. महापालिका निवडणूक एकहाती जिंकून भाजपाने इतिहास घडविला असल्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणूक जिंकण्याचा चंग पक्षाने बांधला आहे.
जिल्हा परिषदसाठी भाजपाचे मिशन ‘३५ प्लस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:50 PM