अकोला : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या भारिप बहुजन महासंघ आणि महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग आला असला तरी, सत्ता स्थापनेच्या समीकरणात भाजपने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून, ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे ठरल्यानंतरच भाजप निर्णय घेणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवड १७ जानेवारी रोजी होणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. ५३ सदस्यीय जिल्हा परिषदेत भारिप-बमसंचे सर्वाधिक म्हणजे २३ सदस्य असून, २ अपक्ष सदस्यही या पक्षाकडे असल्याने भारिप-बमसंचे सदस्य संख्याबळ २५ होते. सत्ता स्थापनेसाठी भारिप-बमसंला आता केवळ दोन सदस्यांची गरज असून, त्यासाठी समविचारी पक्षांसोबत हातमिळवणी करण्याची तयारी भारिप-बमसंकडून सुरू करण्यात आली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींनाही वेग आला आहे; परंतु महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे सदस्य संख्याबळ २० होते. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी सदस्य संख्येचा २७ चा आकडा गाठण्यासाठी महाविकास आघाडीला आणखी सात सदस्यांचे पाठबळ लागणार आहे. त्यासाठी सात सदस्य असलेल्या भाजपला महाविकास आघाडीत सहभागी करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू करण्यात आले असले तरी, यासंदर्भात भाजपकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या राजकीय हालचालींमध्ये भाजपने ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली असून, महाविकास आघाडीचे ठरल्यानंतरच भाजपचा निर्णय होणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे काय ठरते आणि भाजपचा निर्णय काय होतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजप गटनेत्यांची आज निवड! भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक बुधवार, १५ जानेवारी रोजी होणार असून, या बैठकीत भाजपच्या जिल्हा परिषद गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी दिली. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपचा अद्याप कोणताही निर्णय झाला नाही, असेही त्यांनी सांगितले.
सत्ता स्थापनेच्या हालचालीत भाजपचे 'वेट अँड वॉच'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 10:34 PM