अकोला : गत पंधरा दिवसांपासून पाऊस होत नसल्यामुळे पिकांची वाढ तर खुंटली आहेच, सोबतच विविध किडींचाही हल्ला वाढला आहे. तृण धान्याच्या पिकांवर गत काही दिवसांपासून गोनोसेफॅलम इंडिकम भुंग्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामीण भागात या भुंग्याला काळी म्हैस संबोधण्यात येते. पश्चिम विदर्भात ही कीड २ ते ३ वर्षांपासून हरभरा पिकांवर आढळून येत होती. मात्र, यावर्षी प्रथमच ही कीड खरीप पिकांवर दिसून येत आहे. गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी दिल्यामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे पिकांची मुळे उघडी पडली असून, त्यावर किडींनी हल्ला चढविला आहे. आधीच पावसाअभावी कोमेजले असलेल्या पिकांची अवस्था या किडींमुळे भयंकर झाली असून, शेतकर्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. पावसाच्या लहरीपणामुळे व भारी पावसाची वारंवारिता अत्यंत कमी असल्यामुळे जमिनीतील किडी फोफावण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. जमिनीतील किडींमध्ये सर्वसाधारण वाणी, जमिनीवरचे नाकतोडे, क्रिक्रेट, गोनोसेफॅलम भुंगा यांचा समावेश होतो. गोनोसेफॅलम इंडिकम भुंग्याला ग्रामीण भागात काळी म्हैस म्हणून ओळखतात. ही जमिनीत सक्रिय असलेली कीड असून, मुख्यत: पिकांच्या अवशेषांवर जगते. मात्र, खाद्याची कमतरता जाणवल्यावर भुंगे व अळ्या भुईमूग, हरभरा, सोयाबीन, कापूस, सुर्यफूल, ज्वारी, मूग, मका आदी पिकांवर हल्ला करतात. ही किडी बहुभक्षी असून, जमिनीत पेरलेले बियाणे व रोपटे यांच्यावर हल्ला करतात. तणयुक्त पडीक जमीन, ज्वारीसह गवतवर्गीय तणे यावर ही कीड जगते. पेरणीनंतर पावसामध्ये खंड पडल्यामुळे जमिनीला भेगा पडायला सुरुवात होते. त्यामुळे नुकतेच उगवलेल्या रोपांची मुळे उघडे पडतात. या परिस्थितीत पिकांना या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. जोरदार पाऊस झाल्यास ही कीड जमिनीत दबून नष्ट होते.
खरीप पिकांवरही आता काळ्या म्हशींचा हल्ला
By admin | Published: July 07, 2015 1:43 AM