अकोला : कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्ह्यात रेमडेसिविरची मागणी वाढत आहे. मागणीच्या तुलनेत रेमडेसिविरचा पुरवठा कमी होत असल्याने जिल्ह्यात या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. याच संधीचा लाभ घेत काही लोक रेमडेसिविरचा काळाबाजार करत असल्याचा प्रकार शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून उघडकीस आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत शुक्रवारी तीन रेमडेसिविर इंजेक्शनसह दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड उपचारासाठी उपयुक्त असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात काळाबाजार सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी पोलिसांनी शहरात सापळा रचून रुग्णाचा बनावट नातेवाईक म्हणून संबंधित व्यक्तीला रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी केली. दरम्यान, २५ हजार रुपयांना एक, या प्रमाणे ७५ हजार रुपयांत तीन रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन देणार असल्याचे आरोपीने सांगितले. शुक्रवारी ठरलेल्या वेळेत ठरलेल्या जागेत आरोपीने ७५ हजार रुपयांना तीन रेमडेसिविर आणून दिले. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना रंगेहात पकडले. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांनी दिली. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
रेमडेसिविरचा काळा बाजार; दोन जण पोलिसांच्या जाळ्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 11:11 AM
The black market of remedivi: २५ हजार रुपयांना एक, या प्रमाणे ७५ हजार रुपयांत तीन रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन देणार असल्याचे आरोपीने सांगितले.
ठळक मुद्देतीन इंजेक्शन केले जप्त२५ हजाराला विकत होते एक इंजेक्शन