अकोला - रेल्वे स्थानकावर तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या पाच दलालांना रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ)जवानांनी रविवारी रात्री अटक केली असून, त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.रेल्वे स्थानक परिसरात तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल सक्रिय असल्याची माहिती आरपीएफला मिळाली. या माहितीवरून आरपीएफने सापळा रचून इफ्तेकार अहमद अब्दुल गफूर, मो. अन्वर मो. इसूफ, मुशर्रफ इकबाल खान, अनिलकुमार कमलकिशोर बागडिया व संदीप वामनराव मस्के या पाच आरोपींना अटक केली, तर मो. नईस शेख व मिलिंद नामक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. या दलालांविरु द्ध रेल्वे अॅक्टनुसार कलम १४३ नुसार कारवाई केली आहे. ही कारवाई आरपीएफचे ठाणेदार लांजेवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यापूर्वीही अनेकदा रेल्वेस्थानकावर तिकिटांचा काळाबाजार करणाºयांना पकडण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोमवारी भुसावळ येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.सीसीटीव्ही फुटेजमध्ये आणखी दलालआरपीएफने सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आणखी दलालांची साखळी समोर येण्याची शक्यता आहे. तिकिटांच्या काळाबाजारामुळे सामान्य प्रवाशांवर मात्र अन्याय होत असल्याने दलालांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.कारवाईचा सपाटा हवारेल्वेस्थानकावर आरक्षित खिडकींवर सर्वात आधी उभे राहायचे आणि एकेका तिकिटांवर फरकाने अधिकचे पैसे प्रवाशांकडून घ्यायचा गोरखधंदा सुरू असल्याचे वास्तव आहे; मात्र पोलिसांकडून बेरच वेळा दुर्लक्ष होत असल्याने दलालांचे चांगलेच फावले असून, त्यांच्यावर धडक कारवाई सुरूच ठेवण्याची मागणी होत आहे.