मूर्तिजापूर, दि. २0- अल्पवयीन युवतीचे शोषण व ब्लॅकमेल करणार्या युवकाची ११ लाख रुपयांची मालमत्ता मूर्तिजापूर शहर पोलिसांनी २0 जानेवारी रोजी जप्त केली. यामध्ये एक फ्लॅट, एक चारचाकी व एका दुचाकीचा समावेश आहे. अल्पवयीन युवतीला ब्लॅकमेल करणारा मनीष राजेश शर्मा हा पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीत तिने आरोपीला अडीच किलोपेक्षा जास्त सोने दिल्याचे नमूद केले आहे. आरोपीने संपूर्ण सोन्याची विल्हेवाट कशाप्रकारे लावली, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. मनीष राजेश शर्मा याने आपला भाऊ व आईच्या सहकार्याने सोन्याची विक्री करून दुचाकी व चार चाकी वाहन खरेदी केले. त्याचप्रमाणे कृष्णा रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील एक फ्लॅट खरेदी केला. तसेच तहसील मार्गावर एक दुकानदेखील भाड्याने घेतले आहे. ही सर्व संपत्ती आरोपीने युवतीने आणलेले दागिने विकून खरेदी केलेली आहे. त्यामुळे, पोलिसांनी फ्लॅटला सील लावले .
‘ब्लॅकमेल’ करून हडपलेले ११ लाख आरोपीकडून जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2017 2:57 AM