अकोला : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार, २९ जूनपासून करण्यात आली. मात्र, जिल्ह्यात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस कोरा ठरला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १४ आणि सात पंचायत समित्यांच्या २८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २९ जूनपासून सुरू करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी (मंगळवारी) जिल्हा परिषदेच्या १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २८ गणांतून एकही उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस निरंक ठरला आहे. पोटनिवडणुकांसाठी सोमवार, ५ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या या १४
गटांत होत आहे पोटनिवडणूक !
जिल्हा परिषदेच्या १४ रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यामध्ये दानापूर, अडगाव बु., तळेगाव बु., अकोलखेड, कुटासा, लाखपुरी, बपोरी, घुसर, कुरणखेड, कानशिवणी, अंदुरा, देगाव, दगडपारवा व शिर्ला इत्यादी १४ गटांचा समावेश आहे.
पंचायत समित्यांच्या या २८
गणांत होत आहे पोटनिवडणूक!
जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या २८ रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यामध्ये हिवरखेड, अडगाव बु., वाडी अदमपूर, भांबेरी, पिंप्री खुर्द, अकोलखेड, मुंडगाव, रौंदळा, लाखपुरी, ब्रम्ही खुर्द, माना, कानडी, दहिहांडा, घुसर, पळसो, कुरणखेड, चिखलगाव, निमकर्दा, पारस भाग १, देगाव, वाडेगाव भाग २, दगडपारवा, मोऱ्हळ, महान, पुनोती बु., शिर्ला, खानापूर व आलेगाव इत्यादी २८ गणांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या जिल्ह्यातील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू करण्यात आली. पोटनिवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषद गट पंचायत समित्यांच्या गणांमध्ये पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ५ जुलैपर्यंत आहे.
संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी जि.प., पं.स. निवडणूक विभाग.
‘