मूर्तिजापूर : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडील ई-पॉस मशीन बंद असल्यामुळे गोरगरिबांना वाटप बंद झाले आहे. माहे मार्च महिन्याचा डेटा अद्यापपर्यंत ई-पॉस मशीनमध्ये उपलब्ध झाला नसल्याने धान्य वाटप प्रक्रिया पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात लाभार्थी चकरा मारुन वैतागले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यावर गोरगरिब अवलंबून आहेत; मात्र ऑनलाईन प्रणालीतील ई-पॉस मशीनमध्ये माहे मार्च महिन्याचा धान्यसाठा नियमनुसार वेळेवर पोहोचला, परंतु डेटा न असल्यामुळे ई-पॉस मशीन शिवाय स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप मनाई आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांसह दुकानदारांसाठी चांगलीच डोकेदुखी बनली आहे. ई-पॉस मशीन तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात बंद असल्यामुळे नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.
___________________________________
दुकानदारांसोबत वाद
रेशन दुकानावर धान्य घेण्यासाठी जाणारे नागरिक दुकानदारांना विचारणा करीत आहेत. मार्च महिन्याचा डेटा ई-पॉस मशीनवर उपलब्ध झाला नसून, डेटा आल्यावरच धान्य वाटप केले जाईल, असे दुकानदार सांगतात. अनेकदा रेशन दुकानात चकरा मारून थकलेले नागरिक दुकानदाराशी वाद करू लागले आहेत. त्यामुळे दुकानदार त्रस्त झाले आहेत. ___________________________________
ई-पॉस मशीनमध्ये माहे मार्च महिन्याचा डेटा न आल्याने नाईलाजाने रेशन दुकानदार धान्य वाटप करू शकत नाही. शासनाच्या गाईड लाईननुसार मॅन्युअली(हाताने वाटप) धान्य देणार मनाई केली आहे. ही समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिकांना स्वस्त धान्य दुकानात चकरा माराव्या लागत आहे.
-कैलास महाजन, स्वस्त धान्य दुकानदार संघटना कार्यकारी जिल्हाध्यक्ष अकोला.