अकाेला : जिल्हाभरातील तसेच मनपा क्षेत्रातील व्यावसायिकांचे सर्व प्लांट बंद करून सील करण्याच्या राष्ट्रीय हरित लवाद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाला जिल्हा प्रशासन व महापालिकेने केराची टाेपली दाखवल्याचे समाेर आले आहे. शहरासह जिल्हाभरात ७८०च्या वर आरओ प्लांट आहेत. त्यापैकी केवळ आठ प्लांटला परवानगी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गल्लीबाेळात सुरू असलेल्या एकाही अनधिकृत आरओ प्लांटला सील लावण्याची कारवाई नाही, आरओ प्रकल्पांच्या माध्यमातून भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा करून त्यावर प्रक्रिया केल्यानंतर पाण्याची धडाक्यात विक्री करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे; परंतु अशा प्रकल्पांमधील थंड पाणी आराेग्यास अपायकारक ठरत आहे. शिवाय अशा प्रकल्पांची तपासणी करण्यासाठी काेणतीही शासकीय यंत्रणा पुढाकार घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिका प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून अशा आरओ प्रकल्पांना परवानगी देताना सर्व निकष, नियम व परवाने तपासण्याची गरज असताना याकडे संबंधित जबाबदार यंत्रणांनी सपशेल पाठ फिरवली आहे.
अनधिकृत आरओ प्लांट प्रशासनाचा आशीर्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:51 AM