अकोला: स्थानिक दिव्यांग आर्ट गॅलरी अकोलातर्फे प्रा. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम अकोल्यात राबविले जात आहेत. या उपक्रमाचा फायदा दिव्यांग बांधवांना होत आहे. असाच एक आगळावेगळा उपक्रम म्हणजे अंध बांधवांना फिटनेसप्रति सजग करणे हा होता. २२ जुलै २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील आलेल्या २०० हून अधिक अंध बांधव व १०० स्वयंसेवकांना योग प्राणायामसह सुदृढतेचे धडे देण्यात आले. अजिंक्य फिटनेस अकोलाचे धनंजय भगत व वैष्णवी गोतमारे यांनी मोबीलिटी ट्रेनिंग कॅम्पमधील अंध बांधवांना फिटनेसचे धडे दिले. निरोगी जीवनासाठी योग व प्राणायम या विषयावर व्याख्यानसुद्धा आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम वॉर्मअपपासून सुरुवात करण्यात आली. प्राणायमाचे विविध प्रकार, सूर्यनमस्कार व विविध योगासने अंध बांधवाकडून करून घेण्यात आली. या कार्यक्रमात अंध विद्यार्थ्यांबरोबरच स्वयंसेवकांनाही प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जागतिक दर्जाचे स्वागत थोरात व तेजस्विनी भालेकर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात दिव्यांग आर्ट गॅलरीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विशाल कोरडे यांच्या हस्ते धनंजय भगत व वैष्णवी गोतमारे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित शिबिरार्थींनी रोज योग व प्राणायम करण्याचा संकल्प घेतला. योग शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीचे डॉ. सतीश उटांगळे, श्रीकांत तळोकार, कार्तिक काळे, प्रसाद झाडे, जानवी राठोड, सुरभी दोडके, गजानन भांबुरकर, कुशल बगडिया, आनंद मानवानी, नगरसेवक श्री आशीष पवित्रकार, भारती घारपडकर, तृप्ती भाटिया, सौ. सरोज तिडके, गीताबली उनवणे, अर्चना परदेशी, प्रतिभा नागदेवते, प्रीती भगत, दिव्या चव्हाण, संकल्प गजघाटे, स्मिता अग्रवाल, साक्षी अग्रवाल आदींनी परिश्रम घेतले.