बुलडाणा, दि. २८- दोन्ही डोळ्यांनी अंध असल्यावरही गांधारी व विदुर शंकरबाबा पापळकर या विद्याथ्यार्ंच्या सुमधुर गायनाचा आनंद गुरुवारी चिखलीकरांना मिळणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच अंध विद्यार्थी विद्यापीठाच्यावतीने आयोजित युवा महोत्सवात गायन करणार आहेत. वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मूकबधिर आश्रमातील दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले विदुर व गांधारी शंकरबाबा पापळकर हे चिखली येथे सुरू असलेल्या अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवात गायन करणार आहेत. त्यांचे गायन ऐकण्यासाठी वझ्झर येथील आश्रमातील शंकरबाबा पापळकरसुद्धा येणार आहेत.अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात असलेल्या वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मूकबधिर आश्रमात अनेक मूकबधिर व अंध- दिव्यांग मुले राहतात. त्यांचे पालन पोषण शंकरबाबा पापळकर गत अनेक वर्षांंपासून करीत आहेत. येथेच वास्तव्यास असलेली तसेच दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली गांधारी शंकरबाबा पापळकर ही परतवाडा येथील सर्मथ महाविद्यालयात बी.ए. भाग एकमध्ये शिक्षण घेत आहे. तसेच विदुर हा राम मेघे महाविद्यालय बडनेरा येथे एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेत आहे. या दोघांनाही बालपणापासून गायनाची आवड होती. जिद्द व मेहनतीच्या बळावर ते यामध्ये पारंगत झाले. चिखली येथील शि. प्र. म. चे तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालयात गत दोन दिवसांपासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात २९ सप्टेंबर रोजी बी.ए.एम.एस. महाविद्यालयातील धन्वंतरी कक्षामध्ये पहिल्या मजल्यावर विदुर व गांधारी सुगम संगीत कार्यक्रमांतर्गत गायन करणार आहेत. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला विदुर व गांधारी शंकरबाबा पापळकर हे गुरुवारी गायन करणार आहेत. विद्यापीठाचा विद्यार्थी असला, तर तो महोत्सवातील कार्यक्रमांमध्ये गायन करू शकतो. यामध्ये कोणतीही बंधने नाहीत. - प्रा. एम. टी. देशमुख सांस्कृतिक समन्वयक, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
युवा महोत्सवाच्या इतिहासात प्रथमच गाणार अंध विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2016 1:46 AM