अकोला: दोघांच्याही घरची परिस्थिती हलाखिची. त्यात दोघेही दृष्टिबाधित. अशा परिस्थितीत कुटुंब, त्यांचा उदरनिर्वाहाची जबाबदारी पार पाडण्यासाठी दृष्टिबाधित कैलास पानबुडे आणि लक्ष्मी वाघ चेतन सेवांकूरच्या आर्केस्ट्रामध्ये गाणे गायचे. सोबत गाणे गाता गाता त्या दोघांचे सूर केव्हा जुळले, कळलेच नाही. सहृदयी कार्यकर्त्यांनी या दृष्टिबाधित जोडप्याचे लग्नच जुळविले नाही तर स्वखर्चातून त्यांचे थाटात लग्न लावून दिले.कैलास वसंतराव पानबुडे हा कारंजा तालुक्यातील झोडग्याचा राहणारा. वडील अंथरूणाला खिळलेले. त्यातच दृष्टिबाधित कैलासच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. एमएच्या शिक्षणासोबत त्याने गायनाचे धडे घेतले. वाशिमजवळील केकतउमरा येथील पांडुरंग उचितकर यांचा मुलगा चेतन उचितकर याच्या सेवांकूर फाउंडेशनच्या आर्केस्टामध्ये तो गातो. त्याच्या सोबतीला लक्ष्मी बळीराम वाघ ही असायची. लक्ष्मीच्या घरची परिस्थितीसुद्धा हलाखिचीच. पितृछत्र हरविलेल्या लक्ष्मीची आई अकोल्यात घरोघरी पोळ्या लाटून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविते. लक्ष्मीनेसुद्धा आईला हातभार लावण्यासाठी चेतन सेवांकूर फाउंडेशनच्या आर्केस्ट्रामध्ये गायनाला सुरुवात केली. लक्ष्मी सध्या बीए अंतिम वर्षाला शिकते. कैलास व लक्ष्मी सोबत गायचे. याच मंचावर दोघांच्या सहजीवनाचे सूर जुळून आले. पांडूरंग उचितकर यांनी लक्ष्मीच्या आईची परवानगीने लग्न जुळविले; परंतु लग्न करायचे कसे? असा प्रश्न उपस्थित झाला. त्याच्या मदतीला अरूण राऊत(जिजाऊ वाडा), राजेंद्र जळमकर, सुधाकर आमले, ज्ञानेश्वर राऊत, प्रदीप काळे, धनंजय भगत, सुहास गावंडे, किशोर राऊत, प्रसाद बाळंखे आदी सहृदयी मंडळी धावून आली. अरूण राऊत यांनी जिजाऊ वाड्यातच त्यांचा विवाह लावून देण्याचे ठरविले. सर्व तयारी, पाहुण्यांच्या जेवणावळीची व्यवस्था सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी केली आणि २३ जून रोजी सकाळी ११ वाजता सनई चौघड्याच्या सुमधुर निनादात, वधू-वरांच्या नातेवाईक व मान्यवरांच्या उपस्थितीत कैलास, लक्ष्मीचा विवाह वृंदावन नगरातील जिजाऊ वाड्यात थाटात पार पडला. सामाजिक जाणिवेतून दोन्ही गरीब कुटुंबांना मदतीचा हात देऊन या सहृदयी कार्यकर्त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे दृष्टिबाधित जोडप्याच्या सहजीवनाची सुरुवात झाली. (प्रतिनिधी)प्रसिद्ध वºहाडी कवी विठ्ठल वाघांची उपस्थितीकैलास व लक्ष्मीच्या विवाहामध्ये विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध वºहाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी सपत्नीक हजेरी लावली. यावेळी त्यांनी वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. वाशिमचे राजीवसिंह कपूरसुद्धा यावेळी उपस्थित होते.