अकोला : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म १० व ११ च्या विस्तारासंदर्भात प्री नॉन-इंटरलॉकिंग (एनआई) साठी मध्य रेल्वे विशेष ब्लॉक २२ ते ३० मे पर्यंत विशेष ब्लॉक संचालीत करणार आहे. या ब्लॉकचा परिणाम अकोल्यासह संपूर्ण वऱ्हाडातील प्रवाशांना मुंबई येथे जाण्यासाठी सर्वाधिक सोयीच्या असलेल्या १२११२ अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेसवरही होणार असून, ही दैनंदिन रेल्वे २७ मे ते ३० मे या कालावधीत ठाणे स्थानकापर्यंतच धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
मध्य रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २४ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी प्लॅटफॉर्म १० व ११ च्या विस्तारासंदर्भात प्री नॉन-इंटरलॉकिंग (एनआई) कामांसाठी विशेष ब्लॉक चालवणार आहे. त्यामुळे सीएसएमटी येथून सुटणाऱ्या व या स्थानकापर्यंत येणाऱ्या अनेक गाड्या प्रभावित झाल्या आहेत. काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या दादर व ठाणे स्थानकापर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. यामध्ये अकोला मार्ग धावणाऱ्या गाड्यांचाही समावेश आहे. हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याने प्रवाशांनी गैरसोयीसाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबई मेल ९ दिवस दादरपर्यंतच धावणार
ब्लॉकचा परिणाम म्हणून अनेक गाड्या प्रभावित झाल्या आहेत. २१ ते २९ मे या कालावधीत १२८१० हावडा-मुंबई मेल दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येत आहे. तर २४ मे रोजी प्रवास सुरु होणारी १२८७० हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस दादर स्थानकावर शॉर्टटर्मिनेट करण्यात येणार आहे.