अकोला: गत महिनाभरापासून जिल्ह्यात कोविडची रुग्णसंख्या वाढ नियंत्रणात येताना दिसून येत आहे. दररोज हजारावर नमुन्यांची चाचणी केली जात असून, जिल्ह्यात अद्याप एकही डेल्टा प्लसचा रुग्ण आढळला नाही. दररोज प्राप्त अहवालातून पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या दहाच्या आत असल्याने जिल्ह्याची वाटचाल कोविडमुक्तीकडे असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यात कोविडची दुसरी लाट ओसरली असून, सद्यस्थितीत रुग्णसंख्या वाढीचा आलेख नियंत्रणात आहे, तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही केवळ ४४ आहे. ही स्थिती पाहता, जिल्हा कोविडमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसून येत आहे, शिवाय डेल्टा प्लसचा संभाव्य धोका लक्षात घेता, दर महिन्याला शंभर पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने तपासणीसाठी दिल्ली येथे पाठविण्यात येत आहेत. आतापर्यंत सुमारे ३०० पेक्षा जास्त नमुने तपासणीसाठी दिल्लीला पाठविण्यात आले असून, एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नसल्याची माहिती आहे. अकोलेकरांसाठी ही बाब दिलासादायक असली, तरी जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची कुठेच चाचणी होत नसल्याने, डेल्टा प्लसचा संभाव्य धोका नाकारता येत नाही.
कोठे, काय घेतली जात आहे दक्षता?
बस स्थानक - बस प्रवासातून जिल्ह्याबाहेरील लोक जिल्ह्यात दाखल होत आहेत. मात्र, त्यांची प्राथमिक आरोग्य चाचणीही बस स्थानकात होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
रेल्वे स्थानक - बस स्थानकाप्रमाणेच रेल्वे स्थानकाची स्थिती आहे. येथे राज्याबाहेरील प्रवासीही येतात. मात्र, त्यांची कुठल्याच प्रकारची तपासणी केली जात नसल्याचे चित्र दिसून येते.
शहरातील एन्ट्री पॉइंट - शहरातील एन्ट्री पॉइंटवरही कुठलीच तपासणी होत नसल्याचे दिसून येते. वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी असून, विनामास्क प्रवास करत असल्याचे चित्र दिसून येते.
कोरोनाचे एकूण रुग्ण - ५७,७७४
कोरोनाचे बरे झालेले रुग्ण - ५६,५९६
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - ४४
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग
जिल्ह्यात आतापर्यंत ५६ हजार ८३८ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले, तसेच २ हजार २०२ कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रकरण पेंडिंग आहेत. यापैकी ३६ हजार २७५ हायरिस्क कॉन्टॅक्ट आहे. जिल्ह्यातील बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणात असल्याने त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशा संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणेही गरजेचे आहे.
शहरीसह ग्रामीण भागावर लक्ष देण्याची गरज
सद्यस्थितीत रुग्णांची संख्या घटली आहे. मात्र, बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणात असल्याने, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त आहे. अशा व्यक्तींची कोविड चाचणी होणे गरजेचे आहे.
कोविडची स्थिती नियंत्रणात असल्याने अनेक जण बेफिकिरीने वावरत आहे. बहुतांश लोक मास्कचा वापर टाळत असून, बाजारपेठेत गर्दी करत आहेत, हीच स्थिती शहरी भागातही आहे.
नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज सद्यस्थितीत कोविडची स्थिती नियंत्रणात आहे. मात्र, डेल्टा प्लसचा संभाव्य धोका लक्षात घेता, नागरिकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन चाचण्या मिळून दररोज हजारावर चाचण्या होत आहेत, तसेच महिन्याला शंभर पॉझिटिव्ह रुग्णांची नमुने डेल्टाच्या चाचणीसाठी दिल्लीला पाठविले जात आहेत.
- डॉ.राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला मंडळ, अकोला.