लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतील डीप फ्रिझर बंद पडल्याने ब्लड कंपोनंटची साठवणूक ठप्प पडली आहे. मागील १५ दिवसांपासून ही स्थिती अशीच असल्याने रुग्णांना प्लेटलेट्ससह इतर रक्त घटकांसाठी खासगी रक्तपेढ्यांचा आधार घ्यावा लागत आहे.सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय रक्तपेढी ही गत काही वर्षांपासून रक्तसंकलनात आघाडीवर आहे. त्यामुळे या ठिकाणी संकलित रक्तसाठ्यातून होल ब्लडसह फ्रॉझन प्लाझ्मा व इतर घटकही मोठ्या प्रमाणात साठवून ठेवले जातात. विशेष म्हणजे येथे दोन डीप फ्रिझर असल्याने रक्त घटकांची साठवणूक क्षमताही चांगली आहे; मात्र येथील दोन्ही डीप फ्रिझरमध्ये बिघाड झाला असून, एक डीप फ्रिझर पूर्णत: बंद पडले आहे. त्यामुळे मागील १५ दिवसांपासून येथील रक्त घटकांची साठवणूक ठप्प पडली आहे. परिणामी येथे येणाऱ्या रुग्णांना रक्त घटक उपलब्ध होत नाही. ऐन वेळी रुग्णांना रक्त व रक्त घटक मिळत नसल्याने रुग्णांना खासगी रक्तपेढ्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
इस्टिमेटची प्रतीक्षायेथील डीप फ्रिझर बंद पडून १५ दिवसांचा कालावधी झाला आहे. दरम्यान, येथे आरोग्य विभागातील एका पथकाने डीप फ्रिझरची पाहणी केल्याची माहिती आहे. या संदर्भात दिल्लीला माहिती पाठविण्यात आली असून, येथूनच नवीन डीप फ्रिझर खरेदीसाठी इस्टिमेट पाठविण्यात येणार आहे; परंतु हे इस्टिमेट कधी येईल, या संदर्भात अद्याप काहीच स्पष्ट नाही.
दलालही सक्रियशासकीय रक्तपेढीत रुग्णांना रक्त व रक्तघटक उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. हीच संधी साधून परिसरात काही दलालही सक्रिय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वीही सर्वोपचार रुग्णालय परिसरात रक्तासाठी दलाली झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या.
मागील १५ दिवसांपासून डीप फ्रिझर बंद पडले असून, या संदर्भात वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. लवकरच नवीन अत्याधुनिक डीप फ्रिझर उपलब्ध होईल. तोपर्यंत आॅन डिमांड फ्रेश ब्लड कंपोनंट दिले जात आहे. त्यामुळे रुग्णांना अडचण निर्माण होत नाही.- डॉ. श्रीराम चोपडे, विभाग प्रमुख, शासकीय रक्तपेढी, जीएमसी, अकोला