अकोला: रक्तगटाचा शोध लागून शतक उलटले तरी.. समाजातील ८0 टक्के लोकांना त्यांचा रक्तगट माहीत नाही. रक्तदान आणि रक्तगट तपासणीविषयी समाजात अद्यापही गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करून, रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्याचे काम आणि रक्ताची नाती निर्माण करण्याचे काम एक कार्यकर्ता करतो आहे, तो आहे, डॉ. राम बालकिशन मंत्री. शाळा, महाविद्यालये, गावोगावी फिरून मोफत रक्तगट तपासणी शिबिरांच्या माध्यमातून रक्तदान चळवळ जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न डॉ. राम गत अनेक वर्षांंपासून करताहेत. राम मंत्री हे १५, २0 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात काम करतात. ८ वर्ष शासकीय सेवेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणूनही त्यांनी काम केले. दरम्यान, त्यांना ग्रामीण भागाशी जवळचा संबंध आला. अनेकांना रक्तगट माहिती नसल्याने त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले, अपघात झाला, आजार झाला आणि रक्त देण्याची गरज पडली; परंतु रक्तगटच माहीत नसल्याने, रुग्णाची व नातेवाइकांची होणारी विचलता, त्यांनी अनुभवली आणि रक्तदानाविषयीचे ग्रामीण भागात असलेले गैरसमजसुद्धा त्यांच्या लक्षात आले. पुढे त्यांनी शासकीय नोकरी सोडून स्वत:ची लॅब सुरू केली आणि डॉ. हिरालाल मंत्री स्मृती आरोग्य मित्र परिवाराची स्थापना केली. यातून त्यांनी स्वैच्छिक रक्तगट तपासणी चळवळ उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू केला. प्रत्येक व्यक्तीला रक्तगट माहिती व्हावा आणि त्याचे रक्तगट कार्ड त्याच्याकडे असावे आणि त्यातून स्वैच्छिक रक्तदाते तयार व्हावेत, या उदात्त हेतूने डॉ. राम मंत्री यांनी शाळा, महाविद्यालयांसोबतच गावागावांमध्ये जाऊन रक्तगट तपासणी शिबिरे आयोजित केली. एवढेच नाही तर रक्तगटासोबतच रक्तदानाचे महत्त्वही पटवून दिले आणि रक्तगट तपासणीनंतर मोफत लाइफटाइम कार्ड उपलब्ध करून दिले. गत ७, ८ वर्षांंमध्ये पश्चिम विदर्भात ५0 हजारांच्या जवळपास व्यक्तींचे मोफत रक्तगट त्यांनी तपासून दिले आहेत. डॉ. राम मंत्री यांनी केलेले कार्य समाजासाठी एक प्रेरणावाट आहे.
रक्ताची नाती जपणारा कार्यकर्ता..
By admin | Published: December 09, 2015 2:51 AM