- अतुल जयस्वाल
अकोला : पश्चिम विदर्भाचे ट्रामा केअर सेंटर अशी ओळख निर्माण झालेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत सर्वच गटाच्या रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. दैनंदिन गरज भागविण्यापूरताही रक्तसाठा नसल्याने गरजू रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तासाठी धावपळ करावी लागत आहे. बुधवार, १६ मे रोजी रक्तपेढीत केवळ रक्ताच्या ७५ पिशव्या उपलब्ध असल्याची नोंद ‘ई-रक्तकोष’वर आहे.अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर लगतच्या बुलडाणा, वाशिम व अमरावती जिल्ह्यातूनही रुग्ण येतात. साहजिकच येथे बाराही महिने रक्ताची मोठी गरज भासते. अपघातातील जखमी, सिझेरियन प्रसूति, इतर शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना रक्ताची गरज भासते. यासाठी रुग्णालयात रक्तपेढी असून, या ठिकाणी गरजूंना मोफत रक्त उपलब्ध करून दिल्या जाते. रुग्णालयात गरजू रुग्णांना दररोज साधारणत: ३० ते ४० पिशव्यांची आवश्यकता भासते. उन्हाळ्यात दरवर्षी रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. यावर्षीही रक्तपेढीत सर्वच गटाच्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तपेढीत रक्त मिळत नसल्याने नाइलाजाने अनेक रुग्णांना खासगी रक्तपेढ्यांमधून रक्त विकत घ्यावे लागत आहे.असा आहे रक्तसाठा‘सर्वोपचार’मधील रक्तपेढीत बुधवारी बी-पॉझिटीव्ह -४, बी-निगेटिव्ह- ३, ओ-पॉझिटिव्ह - ४०, ओ-निगेटिव्ह- ७, एबी-पॉझिटीव्ह - ७, एबी-निगेटिव्ह-३, ए-पॉझिटीव्ह- ९, ए- निगेटिव्ह-२ असा एकूण ७५ पिशव्या रक्तसाठा उपलब्ध होता.बी-पॉझिटीव्हला सर्वाधिक मागणीरुग्णालयात दाखल रुग्णांना सर्वच गटांच्या रक्तांची गरज असते; परंतु यामध्ये बी-पॉझिटीव्ह गटाच्या रक्ताची सर्वाधिक मागणी राहते. या गटाच्या रक्ताचा नेहमीच तुटवडा भासतो. सध्याच्या घडीला रक्तपेढीत बी-पॉझिटीव्हच्या ४, तर बी-निगेटिव्हच्या केवळ ३ पिशव्या आहेत.दलाल घेताहेत फायदामागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी परिस्थिती निर्माण झाली असून, रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना वणवण भटकावे लागते. रक्त मिळवून देण्याच्या नावाखाली सर्वोपचार रुग्णालय परिसरात सक्रिय असलेले दलाल गरजूंच्या अगतिकतेचा फायदा घेतात. रक्ताच्या मोबदल्यात रुग्णाच्या नातेवाईक महिलेकडे शरीरसुखाची मागणी झाल्याचा प्रकार रुग्णालय परिसरात अलिकडेच उघडकीस आला होता, हे येथे उल्लेखनीय आहे.रक्तदात्यांना आवाहनदरवर्षी उन्हाळ्यात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. रक्तपेढीत येऊन रक्तदान करणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी असली, तरी उन्हाळ्यात हे प्रमाण कमी होते. रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी रक्तदात्यांनी समोर यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.शासकीय रक्तपेढीत पुरेसा रक्तसाठा उपलब्ध नसला तरी रुग्णांची गरज भागविली जात आहे. सिझेरियन प्रसूतिसाठी तर कोणताही ‘डोनर’ न घेता रक्त उपलब्ध करून दिले जाते. अन्य परिस्थितीत ‘डोनर’ आणणाºयांना रक्त दिले जाते. रुग्णांच्या नातेवाइकांनी रक्ताची गरज असल्यास कोणत्याही मध्यस्थाशी संपर्क न साधता थेट रक्तपेढीत येऊन मागणी नोंदवावी.- डॉ. बाळकृष्ण नामधारी, रक्तपेढी प्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.