अकोला: सर्वोपचार रुग्णालयात आपत्कालीन पॅथॉलॉजीच्या बंद खिडकीत रुग्णांच्या रक्ताचे नमुने बेवारस ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने शुक्रवार, २२ फेब्रुवारी रोजी उघडकीस आणला होता. याप्रकरणी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी पॅथॉलॉजी प्रमुखांना खडसावले असून, ठोस कार्यप्रणालीचा अवलंब करण्याबाबत सूचना दिली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल रुग्णांच्या आजाराचे निदान व्हावे म्हणून तपासणीसाठी काढण्यात आलेल्या रक्ताचे नमुने बेवारस ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. यानंतर प्रशासन खडबडून जागी झाले. अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी संबंधित पॅथॉलॉजी प्रमुखांना खडसावले. नियमानुसार हे नमुने तपासणीसाठी येथील पॅथॉलॉजीमध्ये जाणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने या ठिकाणी ठोस कार्यप्रणाली राबविण्याबाबत त्यांनी विभाग प्रमुखांना सूचित केले. त्यानुसार वॉर्डामध्ये रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतल्यानंतर ते थेट पॅथॉलॉजीमध्ये नेण्यात येत आहेत. यासाठी लवकरच स्वतंत्र व्यवस्था केली जाणार असल्याचेही अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी सांगितले.सूचना अद्याप भिंतीवरच!आपत्कालीन पॅथॉलॉजीच्या बंद खिडकीजवळ ‘रक्ताचे नमुने येथे ठेवा’ अशी सूचना लावण्यात आली आहे. त्यानुसार रुग्णांचे नातेवाईक या ठिकाणी रक्ताचे नमुने ठेवत; पण हा प्रकार उघडकीस आल्यानंतरही या भिंतीवर ही सूचना कायमच आहे. त्यामुळे आणखी रक्ताचे नमुने या ठिकाणी बेवारस ठेवण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.रिक्त पदांची समस्या गंभीरशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात वर्ग चारच्या रिक्त पदांची समस्या गंभीर आहे. परिणामी, तपासणीसाठी घेतलेले रक्ताचे नमुने संकलित करण्यासाठीदेखील मनुष्यबळ नाही. याचप्रमाणे रुग्णालयाची स्वच्छता आणि इतर अनेक बाबींवरदेखील रिक्त पदांचा थेट परिणाम दिसून येतो.याप्रकरणी संबंधित विभाग प्रमुखांना सूचना दिली असून, यापुढे असा प्रकार घडणार नाही. यासाठी ठोस कार्यप्रणाली राबविण्यात येणार आहे.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.