अकोला : शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका विवाहित महिलेवर तिच्याच पतीने प्राणघातक हल्ला केल्यानंतर गत तीन महिन्यांपासून उपचार सुरू असलेल्या जखमी महिलेचा अखेर गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. प्रेमविवाह केल्यानंतर त्याचा रक्तरंजीत अंत झाला असून, नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला.आदर्श कॉलनीतील तीन बंगल्याजवळ निशा इंगळे (१९) या विवाहित महिलेवर तिचा प्रेमविवाह केलेला पती आकाश मांडलेकर याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना २७ जून रोजी सायंकाळी घडली होती. घटनेनंतर जखमी महिलेला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही महिन्यांआधी निशा इंगळे हिचा प्रेमविवाह झाला होता. आदर्श कॉलनीतून निशा इंगळे ही तिच्या मैत्रिणीसोबत जात होती. त्यावेळी तिथे तिचा पती आकाश मांडलेकर त्याने तिच्यावर थेट चाकूने सपासप वार केले. यावेळी त्याने या महिलेच्या छातीवर, हातावर आणि अंगावर चाकूने वार केले. त्यानंतर ती रक्तबंबाळ झाली होती. तिच्या मैत्रिणीने आरडाओरडा केली. त्यानंतर खदान पोलिसांना माहिती देऊन तिला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते. प्राथमिक उपचारानंतर जखमी महिलेवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्बल तीन महिन्यानंतर उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला असून, खदान पोलिसांनी आता भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.