सचिन राऊत
अकाेला : राज्यातील गुन्हेगारी जगतामध्ये अकाेल्यातील गुन्हेगारीची आकडेवारी टाॅप टेनमध्येच असल्याचे आता गाेपाल अग्रवाल यांच्यावरील गाेळीबाराच्या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात गाेळीबारीच्या घटनांचा रक्तरंजीत इतिहास असून, एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हे दुसरे गाेळ्या झाडून हत्याकांड घडले असून, जिल्ह्यात गत काही वर्षांत गाेळ्या झाडून नऊ हत्याकांड आणि जखमी करण्याच्या गंभीर घटना घडलेल्या आहेत.
एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रुंग्टा टायर रिमाेल्डिंग या कंपनीसमाेर चार वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील शिवणी जिल्ह्यातील तीन जणांनी शर्मा नामक व्यक्तीवर गाेळ्या झाडून त्यांची हत्या केली हाेती. शहरातील प्रसिद्ध उद्याेजक तथा व्यवसायी किशाेर खत्री यांच्यावरही गाेळ्या झाडून त्यांची साेमठाणा शेतशिवारात हत्या करण्यात आली हाेती. या वर्षात सुरुवातीलाच प्रहारचे नेते तुषार पुंडकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली हाेती. त्यानंतर वडिलांवर प्राणघातक हल्ला करण्याच्या बेतात असतानाच बाबा भारती यांनी त्यांचा गुंडप्रवृत्तीचा मुलगा मनीष यांच्यावर गाेळी झाडली हाेती, तर पिंजर पाेलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्यावर पाेलीस अधिकाऱ्यानेच गाेळीबार केल्याचे एक माेठे कांड जिल्ह्यात घडले आहे. आकाेट फैलातील टाेळीयुद्धात कुरेशी नामक व्यक्तीची टाेळीयुद्धातून गाेळ्या झाडून हत्या करण्यात आली हाेती. दरम्यान, शहरालगत असलेल्या मलकापूरचे सरपंच सिद्धेश्वर देशमुख यांच्यावरही गाेळीबार करून त्यांचे हत्याकांड घडविण्यात आले हाेते. यासाेबतच पाेलीस अधिकारी असलेले आयपीएस व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्यावर गाेळी झाडण्यात आली हाेती, तर माजी नगरसेवक रामटेके यांच्यावर दाेन वेळा गाेळीबार झाल्याची नाेंद पाेलिसांत आहे. यावरून अकाेला जिल्ह्यात गाेळीबार करून जखमी करणे तसेच खुनाच्या उद्देशाने गाेळ्या झाडून हत्या झाल्याचा घटनांचा रक्तरंजित इतिहास असल्याचे गाेपाल अग्रवाल यांच्यावर झालेल्या गाेळीबारीच्या घटनेने समाेर आले आहे. मुकीम अहमद आणि आसीफ खान या दाेघांचेही हत्याकांड जिल्ह्यातील माेठ्या घटनांमध्ये असल्याचे स्पष्ट आहे.
वर्षाचा प्रारंभ अन् शेवट गाेळीबाराने
२०२० हे वर्ष संपूर्ण जगासाठी काेराेनाचे माेठे संकट घेऊन आले. मात्र अकाेला जिल्ह्यात २०२० या वर्षांचा प्रारंभ प्रहारचे नेते तुषार पुंडकर यांच्यावरील गाेळीबाराने सुरू झाले, तर शेवटही गाेपाल अग्रवाल यांच्यावर गाेळ्या झाडून त्यांची हत्या करूनच झाला. यावरून पाेलिसांना गाेळीबाराच्या घटनेचीच सलामी वर्षाच्या प्रारंभी आणि शेवटी मिळाली.
घटनांचा तपास तातडीने
गाेळ्या झाडून हत्या करणे तसेच गंभीर जखमी करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र या मोठ्या घटनांचा तपासही पाेलिसांनी तेवढ्याच तातडीने केल्याचे वास्तव आहे. बहुतांश हत्याकांडाचा तपास करण्यात पाेलिसांना यश आले आहे, तर काही प्रकरणात आराेपींना शिक्षाही झाल्याची माहिती आहे.