अकोला : इयत्ता बारावीचा अभ्यासक्रम बदलत असल्यामुळे शिक्षकांना मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू विषयांचे प्रशिक्षण देण्यासाठी अमरावती विभागीय मंडळाने शाळांकडून शिक्षकांची नावे मागितली होती. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातून चारही विषयांच्या २०९ शिक्षकांच्या नावांची यादी मंडळाकडे पाठविली आहे. अद्यापही अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडील शिक्षकांची नावे पाठविली नाहीत.उच्च माध्यमिक स्तरावरील इयत्ता बारावीचा अभ्यासक्रम बदलत असल्यामुळे पुढील परीक्षेमध्ये मराठी हिंदी, इंग्रजी व उर्दू विषयाच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप कसे राहणार आहे, या विषयाची माहिती शिक्षकांना व्हावी आणि त्यांना प्रशिक्षित करावे, या उद्देशाने अमरावती विभागीय मंडळाने या चार विषयांच्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची नावे माध्यमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून मंडळाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रशिक्षणासाठी इच्छुक शिक्षकांच्या नावांची यादी मागविली असून, आतापर्यंत २०९ शिक्षकांच्या नावांची यादी अमरावती विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आली आहे; परंतु आणखी काही कनिष्ठ महाविद्यालयांंना वारंवार सूचना देऊनही त्यांच्याकडील शिक्षकांची यादी प्राप्त झालेली नाही. शिक्षक प्रशिक्षणापासून वंचित राहिल्यास याची जबाबदारी कनिष्ठ महाविद्यालयांची राहील, असा इशारा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिला आहे. जुलै महिन्यात शिक्षकांचे रालतो विज्ञान महाविद्यालय व न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये प्रशिक्षण होणार आहे. अशी माहिती सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी दिली. (प्रतिनिधी)