- आशिष गावंडे अकाेला - तहसीलदारांनी तक्रारकर्त्याच्या नावावर झालेल्या शेत कुळाची अभिलेखावर नाेंद घेण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या शेत मालकीच्या वादात प्रकरणातील गैरअर्जदाराचा अर्ज किंवा त्याबाबतचा आदेश आल्यास त्याची सातबा-यावर नोंद न करण्यासाठी ३० हजार रुपयांपैकी २० हजार रुपये लाच स्वीकारणारा तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी ‘एसीबी’च्या तावडीतून निसटल्याचा धक्कादायक प्रकार १७ जानेवारी राेजी समाेर आला. याप्रकरणी अमरावती येथील ‘एसीबी’च्या चमूकडून शाेधाशाेध सुरु असून स्थानिक विभागातील वरिष्ठ ‘नाॅटरिचेबल’ झाले आहेत.
तहसील विभागात मंडळ अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या एका मंडळ अधिकाऱ्याने तहसीलदारांनी आदेश दिल्यानंतरही तक्रारकर्त्याच्या नावावर झालेल्या शेत कुळाची अभिलेखावर नाेंद घेण्यासाठी टाळाटाळ सुरु केली हाेती. याप्रकरणी नाेंद घेण्यासाठी संबंधित मंडळ अधिकाऱ्याने तक्रारकर्त्याकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारकर्त्याने अकाेलास्थित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार न करता थेट अमरावती येथील ‘एसीबी’कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यावर ‘एसीबी’च्या पथकाने खातरजमा केली असता, मंडळ अधिकाऱ्याने पहिल्या टप्प्यात २० हजार रुपयांची मागणी केली. प्राप्त तक्रारीनुसार १७ जानेवारी राेजी अमरावती येथून आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांदेकर चाैकातील रसिक अॅटोमोबाईल दुकानच्या बाजूला सापळा रचला. परंतु लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी आलेल्या मंडळ अधिकाऱ्याला कारवाइची भनक लागताच त्याने पळ काढल्याचा प्रकार समाेर आला आहे. दरम्यान, याप्रकरणी सीटी काेतवाली पाेलीस ठाण्यात नाेंद करण्यात आली असून ‘एसीबी’पथकाकडून मंडळ अधिकाऱ्याचा शाेध घेतला जात आहे.