लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुक्यातील रेपाडखेड येथील मूळचा रहिवासी असलेल्या शुभम जामनिक याने त्याच्या एका साथीदारासह पुण्यातील घरमालकाच्या तनिष्का आरोडे नावाच्या पाच वर्षीय मुलीचे अपहरण करून नंतर तिचा खून केल्याचे व मृतदेह रेपाडखेड येथे आणून पुरल्याचे प्रकरण ४ जुलै रोजी उघडकीस आले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपी शुभमला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने मुलीचा खून केल्याचे कबूल केले असल्याने अटक केली. रेपाडखेड येथून तनिष्काचा मृतदेह उकरून ‘पोस्टमॉर्टम’नंतर तिच्या पित्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.रेपाडखेडचा शुभम जामनिक कामासाठी पुण्याला गेला होता. तो तेथे दिघी भागातील अमोल आरोडे यांच्या घरात भाड्याने राहत होता. त्याने आरोडे कुटुंबीयाचा विश्वास कमावला. त्यामुळे त्यांनी शुभमला गरजेपोटी ३० हजार रुपये हातउसने दिले होते. शुभमने २८ जून रोजी सकाळी ११ वाजता अमोल आरोडे यांच्या पाच वर्षीय तनिष्का नावाच्या मुलीला फिरवून आणतो, असे सांगून कारमध्ये बसविले. त्यानंतर प्रतीक साठले नावाच्या त्याच्या एका साथीदारासह तनिष्काला सोबत घेऊन तो कारने निघाला. रस्त्यात त्यांनी तनिष्काचा खून केला. तिचा मृतदेह एका बॅगमध्ये भरून ते २९ जून रोजी रेपाडखेडला पोहोचले. तेथे कोरड्या तलावाच्या जागेत तनिष्काचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला; पण पूर्ण न जळाल्याने तेथेच खड्डा करून मृतदेह पुरून टाकला. दरम्यान, रात्र होऊनही तनिष्काला परत आणले नसल्याने आरोडे यांनी पुण्यातील दिघी पोलीस स्टेशनमध्ये शुभमविरोधात तक्रार नोंदविली. त्यानंतर पुणे पोलिसांनी रेपाडखेड येथून शुभम जामनिकला ताब्यात घेतले. त्याला पुण्याला नेऊन चौकशी केली असता त्याने तनिष्काचा खून करून मृतदेह रेपाडखेड येथे पुरल्याचे कबूल केले. त्यामुळे पुणे पोलीस त्याला घेऊन ४ जुलै रोजी मूर्तिजापूरला पोहोचले. तेथून रेपाडखेडला गेल्यानंतर आरोपींच्या सांगण्यानुसार तनिष्काचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर मृतदेह तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला. तनिष्काचे वडील अमोल आरोडे तिचा मृतदेह घेऊन पुण्याला रवाना झाले आहेत. दरम्यान, दुसरा आरोपी प्रतीक साठले यालाही दिघी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भादंविच्या ३०२, २०१ व ३८७ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपी शुभमला घेऊन दिघी पोलीस पुण्याला रवाना झाले आहेत.
अपहृत तनिष्काचा मृतदेह मूर्तिजापूरजवळ मिळाला रेपाडखेडात
By admin | Published: July 05, 2017 1:00 AM