अकोला : येथील एमआयडीसी परिसरातील पाण्याने भरलेल्या खदानीत गणेश विसर्जन करताना गुरुवारी बुडालेल्या शिवणी येथील युवकाचा अखेर शुक्रवारी मृतदेह काढण्यात आला.शिवणी येथील चंदन मोरे (२७) हा गुरुवार, १२ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन करण्यासाठी गेला होता. खदानीतील पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच आपत््ती व्यवस्थापन विभाग व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दीली आणी तात्काळ सर्च आॅपरेशन राबविण्यासाठी पाचारण केले. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात विकी साटोटे, राहुल जवके,मनोज कासोद, मयुर कळसकार,मयुर सळेदार,गोकुळ तायडे, यांनी सर्च आॅपरेशन चालु केले. यावेळी शिवणी येथील श्रीराम वाहुरवाघ,गौतम गवई,पप्पु ठाकुर, गणेश मुंडे, यांनीही शोध मोहिम सुरु केली होती. यापैकी श्रीराम वाहुरवाघ यांनी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांना चेतनच्या मृतदेहाला पाय लागल्याचे सांगितले. यावेळी दीपक सदाफळे यांनी श्रीराम वाहुरवाघ आणी गौतम गवई यांना लोकेशन नुसार समोर पाठवले आणी पाण्यातून मृतदेह वर काढला. यावेळी एम. आय.डी.सी. पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी आणी महसूल चे तलाठी देशमुख हजर होते.
गणेश विसर्जन करताना बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 1:50 PM