अकोला : शहरासह जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मोरणा नदीला प्रचंड पूर आला असून, या पुरात एका अनोळखी युवकाचा मृतदेह शुक्रवारी वाहून आला. हा मृतदेह जुने शहर परिसरात नदीच्या काठावर आल्यानंतर नागरिकांनी नदीबाहेर काढला. त्यानंतर, या प्रकरणाची माहिती जुने शहर पोलिसांना देण्यात आली.
पावसाची संततधार दोन दिवसांपासून सुरू असताना, शुक्रवारी दुपारी एका युवकाचा मृतदेह पुरात वाहून आला. नदीच्या पाण्यात तरंगलेला मृतदेह नागरिकांना दिसल्यानंतर, त्यांनी काठाजवळून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर, या युवकाची ओळख पटविण्यासाठी जुने शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. नदीच्या पाण्यात वाहून आलेला हा मृतदेह शहरालगतच्या एखाद्या खेड्यातील असल्याची माहिती आहे. पाय घसरल्याने किंवा नदीत तोल गेल्याने हा युवक पाण्यासोबत वाहून आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.