- रवी दामोदर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोनाच्या पृष्ठभूमिवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक खेळाडू आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे खेळाडूंना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी प्रतिक्रिया चार वेळा विदर्भ श्री विजेते जीतू गवई यांनी ‘लोकमत’ला दिली.गुणवत्ता ठासून भरलेली असल्याने फक्त आधार मिळाल्यास यश संपादन करण्याची जिद्द व कठीण परिश्रम याच्या जोरावर जीतू गवई यांनी बॉडीबिल्डींग क्षेत्रात नावलौकिक मिळविले आहे. त्यांनी सन २०११ पासून बॉडीबिल्डींग स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला. जीतू यांनी मिस्टर अकोला श्री, भीम श्री, तसेच चार वेळा विदर्भ श्री पदकावर आपले नाव कोरले आहे. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची, वडील ग्रामीण डाकसेवक व आई गृहिणी. संसाराचे गाडे सुरू असताना जीतुुला आहार म्हणून दूध, बदाम, कडधान्य, अंडी, मांसाहार व फळे या गोष्टींची जुळवाजुुळव करताना फार ओढातान होते, अशी भावना जीतूचे वडील जगदेव गवई यांनी दिली. तसेच ‘जमेल तितके आम्ही करतो. त्याच्याजवळ परिश्रम करण्याची जिद्द असल्याने केवळ आहाराच्या कमतरतेमुळे त्याच्या प्रगतीचा वेग मंद होईल, अशी चिंताही व्यक्त केली. तसेच खेळाडूंना समाजाने दातृत्वाचा हात दिल्यास हे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळी गाठू शकतात, असा विश्वास त्यांनी दर्शविला. यावेळी जीतू यांनी दरवर्षी शरीरावर जवळपास ३ लाख रुपये खर्च येतो, असे सांगितले; तसेच सध्या लॉकडाऊनमुळे बॉडीबिल्डरच नव्हे, तर सर्वच खेळाडू आर्थिक विवंचनेत सापडले आहे. त्यामुळे शासनाने मासिक मानधन सुरू करण्याची मागणी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
जीम सुरू करा!कोरोनाच्या पृष्ठभूमिवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे जीम बंद ठेवण्यात आले आहेत.त्यामुळे बॉडिबिल्डर खेळाडूंपुढे फिटनेस टिकण्याचे मोठे आव्हान उभे आहे. त्यामुळे तत्काळ जीम सुरू करण्याची मागणी जीतू गवई यांनी केली आहे.