अकोला : दहशतवादी कारवायांसोबतच, फसवणूक, अश्लील संवाद साधण्यासाठी बोगस सिमकार्ड वापरत असल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने शहरातील मोबाईल सिमकार्डधारकांची चौकशी सुरू केली. शहरातील ७५0 मोबाइल सिमकार्डधारकांची चौकशी केल्यानंतर ५७ सिमकार्ड बोगस असल्याचे निष्पन्न झाले. मोबाइल सिमकार्डची विक्री करण्यासाठी छायाचित्र असलेल्या कोणत्याही एका ओळखपत्राचा पुरावा लागतो; परंतु सिमकार्ड विक्रेत्यांसोबतच मोबाइल शॉपचे चालक दुसर्याच्या ओळखपत्रांचा वापर करून कुणालाही सर्रास सिमकार्डची विक्री करतात. सिमकार्डचा दुरुपयोग वाढल्याने ओळखपत्रधारकांना त्याचा त्रास होतो. एवढेच नाहीतर विविध प्रकारचे गुन्हे करण्यासाठीही बोगस सिमकार्डचा वापर होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. दहशतवादविरोधी पथकाने शहरातील मोबाइल सिमकार्डधारकांची तपासणीचे काम हाती घेतले आहे. गत काही दिवसांपासून शहरातील सातही पोलिस ठाण्यांतर्गत येणार्या परिसरामधील मोबाइल सिमकार्डधारकांची पथकाकडून तपासणी करण्यात आली. पोलिसांनी शहरातील एकूण ७५0 मोबाइल सिमकार्डधारकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून चौकशी केली. चौकशीदरम्यान ५७ सिमकार्ड बोगस असल्याचे उघड झाले. मोबाईल सिमकार्ड तपासणीची मोहीम सुरू राहणार आहे. अकोला शहरामध्ये विविध कंपन्यांचे ३ लाखांच्या वर सिमकार्डधारक आहेत.
अकोला शहरात बोगस ५७ सिमकार्ड!
By admin | Published: December 04, 2014 1:40 AM