राजरत्न सिरसाट अकोला : बीटी बियाण्यात तणनाशक तंत्रज्ञान असल्याचे भासवून सर्रास बोगस बीटी कापसाचे बियाणे गत दोन वर्षापासून शेतकर्यांच्या माथी मारले जात आहे. यावर्षीही हे बोगस बियाणे वर्हाडात दाखल झाले आहे. यावर्षी कापसाचा पेरणी वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत असल्याने इतरही चार नावाने बोगस बीटी बाजारात येण्यार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.त्यादृष्टीने शेतकर्यांनी सावध राहण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.या खरीप हंगामात कापसाचा पेरा वाढणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे चांगल्या व भरघोस उत्पादनासाठी शेतकर्यांचा कल बीटी बियाणे खरेदी करण्यावर राहील; परंतु यावर्षीही बोगस वाण शेतकर्यांना माथी मारले जाणार असल्याचे जाणकारांच्या वर्तुळात बोलले जात आहे. हे बियाणे अधिकृत नसून, या बियाण्यांना विकण्याची शासनाने परवानगी दिलेली नाही.या बियाण्यांच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केलेली आहे, याचा उल्लेख नाही. असे असताना या बीटीची विदर्भात दोन-चार वर्षांपासून सर्रास विक्री होत आहे. गत वर्षी कृषी विभागाने काही जणांवर थातूरमातूर कारवाई केली. अकोला जिल्हयासह वर्हाडातील पाचही जिल्हयात बोगस बियाणे व खते आढळून आली. यापृष्ठभूमीवर कृषी विभाग कोणती दक्षता घेतो याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. शेतकर्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा! कृषी विभाग बोगस बीटी विक्रेत्यांच्या मागावर आहे; परंतु शेतकर्यांनी बियाणे खरेदी करताना पक्के बिल न चुकता घेणे गरजेचे आहे. कृषिसेवा केंद्रधारक पावती देण्यास नकार देत असेल, तर शेतकर्यांनी १८00२३-३४000 या क्रमांकावर संपर्क साधावा.यावर्षी बोगस बीटी बियाण्यांच्या विक्रीवर आतापासूनच पाळत ठेवण्यात येत असून, बीटीची जेथे विक्री होत असेल, तेथे कृषी विभागाचा एक कर्मचारी पहारा देणार आहे. बीटी बियाण्याची संपूर्ण आकडेवारी ठेवली जाणार असून, अमरावती विभाग, जिल्हा, तालुका स्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहेत. - एस.आर. सरदार, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.
बोगस बीटी कापूस बियाण्यांचा धोका !
By admin | Published: May 06, 2017 2:44 AM