- संजय खांडेकरअकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागात जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र बनविणारी टोळी सक्रिय आहे. स्वच्छता कर्मचाऱ्याने जोडलेल्या बोगस प्रमाणपत्रामुळे हे बिंग फुटले असून, विभागीय नियंत्रक कार्यालयाकडून गोपनीय चौकशी सुरू झाली आहे.वाशिम जिल्ह्यातील कारंजा डेपोमध्ये स्वच्छक (स्वच्छता कर्मचारी) असलेला प्रतीक किशोर वानरे नामक २८ वर्षीय कर्मचारी तब्बल सहा महिने आजारी रजेवर होता. आजारी रजेनंतर तो कार्यालयात रूजू होण्यासाठी गेला असता, त्याला वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली. दरम्यान, कारंजा डेपो कार्यालयातील दोघांनी प्रतीकला वाशिमच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील एका व्यक्तीच्या माध्यमातून जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र मिळवून दिले. ओपीडी क्र.१२६९९ नुसार ७ मार्च २०१८ च्या तारखेचे सीएसच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर ९ मार्च १८ रोजी प्रतीक कारंजा डेपोत दस्तऐवज घेऊन रूजू होण्याकरिता गेला. त्यावेळी कार्यालय प्रमुखांनी सीएसच्या प्रमाणपत्रावर आक्षेप नोंदवून बनावट प्रमाणपत्र असल्याचे सांगितले. प्रतीकने कार्यालयातील संबंधित कर्मचाºयांची नावे पुढे केलीत. दरम्यान, कार्यालयीन प्रमुखांनी हे बोगस प्रमाणपत्र अकोला विभाग नियंत्रक कार्यालयाकडे पाठविले. कार्यालयीन कर्मचाºयांनी मिळवून दिलेले प्रमाणपत्र बनावट असल्याची जाणीव जेव्हा प्रतीकला झाली, तेव्हा त्याने यासंदर्भात घटनेची वास्तविकता दर्शविणारे पत्र कारंजा येथील आगार व्यवस्थापक, विभागीय नियंत्रक आणि गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना लिहिले. माफीचा साक्षीदार होण्यासाठी प्रतीकने सर्व वास्तविकता समोर ठेवली असली तरी, विभागीय नियंत्रक कार्यालयाने प्रतीकच्या अर्जाकडे दुर्लक्ष केले आहे. प्रतीकच्या वैद्यकीय बोगस प्रमाणपत्रामुळे तो स्वत: तर अडचणीत आलाच यासोबत प्रमाणपत्र बनविणाºया कार्यालयातील टोळीलाही अडचणीत आणले आहे. दरम्यान, प्रतीकच्या अर्जाची दखल घेऊन वैद्यकीय प्रमाणपत्र बनविणाºयांची टोळी शोधून काढावी, म्हणून अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिसन बाजोरिया यांनी विभागीय नियंत्रकांना पत्र दिले आहे.