- प्रवीण खेतेअकोला : मेडिकल हब म्हणून अकोला जिल्हा नावारूपाला येत आहे; परंतु येथे वैध पदवी नसतानाही वैद्यकीय व्यवसाय करणे, पदवी एका पॅथीची, तर प्रॅक्टिस दुसऱ्या पॅथीची, तसेच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशन अॅक्ट (एमपीटी)नुसार नोंदणी न करता प्रॅक्टिस करणाºया बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याचे वास्तव समोर आले आहे.समाजात डॉक्टरी पेशाला दैवत मानले जाते; परंतु पैशाच्या लोभापोटी काही लोक चुकीच्या पद्धतीने, तसेच नियमांना डावलून प्रॅक्टिस करणारे बोगस डॉक्टर लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचे वास्तव गत काही दिवसांपूर्वी झालेल्या कारवायांमधून उघड झाले आहे. यापूर्वी मे ते जून २०१८ या कालावधीत आरोग्य विभागाच्या विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील दवाखाने व रुग्णालयांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट, महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशन अॅक्टनुसार महाराष्ट्रात प्रॅक्टिससाठी नोंदणी न करणारे डॉक्टर आढळून आले होते. यानंतरही अनेक डॉक्टर नियमांना डावलून जिल्ह्यात प्रॅक्टिस करत असून, रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. यामध्ये प्रामुख्याने डिग्री एका पॅथीची, तर प्रॅक्टिस दुसºया पॅथीची करणाºया डॉक्टरांची संख्या जास्त आहे. शिवाय, इतर राज्यातून डॉक्टरची पदवी मिळवून नियमबाह्य जिल्ह्यात प्रॅक्टिस करत असल्याचीही माहिती आहे. हा प्रकार ग्रामीण भागात सर्रास सुरू असून, विशेष पथकाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.बोगस डॉक्टर विशेष पथकाच्या रडारवरजिल्ह्यातील पुंडा येथील बोगस डॉक्टरांचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध पथक सक्रिय झाले. पथकाकडे आलेल्या तक्रारीनुसार, आणखी दोन बोगस डॉक्टर पथकाच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.तक्रारीची प्रतीक्षाजिल्ह्यात अनेक ठिकाणी नियमांना डावलून चुकीच्या पद्धतीने रुग्णांवर उपचार होत आहेत. शहरी भागात हा प्रकार उघडपणे सुरू आहे; पण त्यांच्या विरुद्ध तक्रार नाही. अशा डॉक्टरांवर कारवाईसाठी पथकाला तक्रारीची प्रतीक्षा करावी लागत आहे.नियमांचे उल्लंघन करून प्रॅक्टिस करणाºया, तसेच ज्यांच्याकडे वैध पदवी नाही अशा डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जाईल. काही दिवसांपूर्वी पुंडा येथील एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली असून, अशीच कारवाई इतरही बोगस डॉक्टरांवर करणार आहोत.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.