अकोला: खरीप हंगाम दोन महिन्यावर येऊन ठेपला असतानाच राज्यात, विदर्भात बोगस खते, कीटकनाशके आली असून, पश्चिम विदर्भात अशा बोगस निविष्ठाचा साठा मागच्या वर्षी आढळून आल्याने कृषी विभाग पुढच्या आठवड्यात या भागात धाडसत्र सुरू करणार असल्याचे वृत्त आहे.पश्चिम विदर्भात बोगस खते, कीटकनाके जप्ती, विक्री बंदच्या सर्वाधिक कारवाया करण्यता आल्या. मागच्या वर्षी अकोला, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात बोगस खतासह कीटकनाशके आढळून आली. बोगस बियाणेदेखील अकोल्यात जप्त करण्यात आली. अकोल्यात मध्यप्रदेश, गुजरात तसेच दक्षिण भारतातील राज्यातून बोगस कृषी निविष्ठा आणल्यात जात असल्याचे कृषी विभागाने मागच्या वर्षी टाकलेल्या धाडीत निदर्शनात आले. मूर्तिजापूर, अकोट तालुक्याच्या ठिकाणी बोगस कृषी निविष्ठाचे उद्योगदेखील निदर्शनात आले. त्यामुळे यावर्षी आतापासूनच कृषी विभागाने याकडे लक्ष केंद्रित केले आहे. खरीप हंगाम दोन महिने पुढे असला तरी सध्या राज्यात उन्हाळी पिकांचा हंगाम सुरू आहे. या पृष्ठभूमीवर कृषी विभागाच्या गुणवंत्ता नियंत्रण विभागाने मागच्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यात धाडी टाकून अप्रामाणित खते व कीटकनाशके जप्त करू न विक्री बंदी घातली आहे.- शेतकऱ्यांना दर्जेदार खते, कीटकनाके, बियाणे मिळावीत यासाठी कृषी विभाग यावर्षी दक्ष असून, विदर्भात मागच्या वर्षी झालेल्या कारवायाच्या अनुषंगाने यावर्षी खबरदारी घेण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून विदर्भात जेथे शंका घेण्याला वाव आहे तेथे धाड टाकून चौकशी करण्यात येईल. ही मोहीम पुढच्या आठवड्यात राबविण्यात येऊ शकते.विजयकुमार इंगळे,संचालक,गुण नियंत्रण, कृषी आयुक्तालय, पुणे.