‘अमृत’याेजनेअंतर्गत शहरात जलवाहिनीचे जाळे टाकून नागरिकांना नळ जाेडणी दिली जात आहे. ज्या नागरिकांकडे वैध नळ कनेक्शन असेल त्यांच्या नळाला अधिकृत मीटर लावल्या जात आहेत. तसेच अवैध नळ जाेडणी धारकांना अवघ्या ४०० रुपयांत वैध नळ जाेडणी देण्याचे प्रशासनाचे निर्देश आहेत. अर्थात ही सर्व कामे करताना मनपाच्या जलप्रदाय विभागातील कंत्राटदारांनी अभय याेजनेंतर्गत ४०० रुपयांत नळ जाेडणी करणे अपेक्षित आहे. तसे न करता अभय याेजनेची माहिती नसणाऱ्या अकाेलेकरांकडून नळ जाेडणीसाठी अव्वाच्या सव्वा दराने पैसे उकळल्या जात असल्याचे प्रकार घडत आहेत. काही बहाद्दर कंत्राटदारांनी चक्क दहा ते पंधरा हजार रुपये उकळल्यानंतरही नळ जाेडणी दिलीच नसल्याचेही उजेडात आले आहे. याप्रकरणी नागरिकांनी नगरसेवकांकडे तक्रारी केल्यानंतर नगरसेवकांनी जलप्रदाय विभागासाेबत पत्रव्यवहार केला. परंतु या पत्रावर जलप्रदाय विभागाने काेणतीही दखल घेतली नसल्याचे समाेर आले आहे.
मनपा आयुक्तांची दिशाभूल
नळ जाेडणीच्या बदल्यात नागरिकांजवळून माेठी आर्थिक रक्कम उकळण्यात आल्याची बाब प्रभाग २ मधील काॅंग्रेसच्या नगरसेविका चांदनी शिंदे यांनी स्थायी समितीच्या सभेत व १८ फेब्रुवारी राेजी ऑनलाईन सर्वसाधारण सभेत नमूद केली हाेती. नगरसेविकेने ही बाब सांगितल्यानंतरही सभेमध्ये जलप्रदाय विभागाने महापाैर अर्चना मसने यांच्यासह मनपा आयुक्त निमा अराेरा यांचीही दिशाभूल केल्याचे दिसून आले.
काॅंग्रेसचे नगरसेवक हतबल
नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या असाे वा मनपातील घाेळाविषयी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करणाऱ्या काॅंग्रेस पक्षातील नगरसेवक पराग कांबळे यांनी व नगरसेविका चांदनी शिंदे यांनी तक्रार केल्यानंतरही प्रशासनाकडून माहिती न देता अथवा कारवाई केली जात नाही. याप्रकाराची दखल घेऊन गटनेता साजीद खान नगरसेवकांच्या समस्या निकाली काढतील का,याकडे लक्ष लागले आहे.