निहिदा: बार्शीटाकळी सामाजिक वनीकरण विभागांतर्गत पिंजर सर्कलमध्ये विविध ठिकाणी वृक्षलागवडीचे काम करण्यात येत आहे. मात्र, वृक्षलागवडीचे काम थातुरमातुर करण्यात आहे. लहान झाडांचे कोणतेही संगोपन होत नसल्यामुळे वृक्षलागवडीचा बोजवारा उडाला आहे.
वृक्षलागवडीच्या नावाखाली दरवर्षी शासन लाखो रुपये खर्च करते. मात्र, सामाजिक वनीकरण विभागाचा कारभार कागदावरच असल्याने गतवर्षी लावलेली झाडे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनाच दिसत नाहीत. शासनाचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जात आहे. १४ जून रोजी पिंजर, भेंडी सूत्रक, खेरडा भागाई रस्त्यावर झाडे लावण्यासाठी चार बोटे खड्डे खोदण्यात आले आणि त्या लहान झाडांना कुंपण लावण्यात आले नाही. त्यामुळे झाडांचे संगोपन कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी या विभागाने तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्ष लागवड केली. मात्र, केलेली वृक्षलागवड आता दिसत नसल्याचे चित्र आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
फोटो:
वृक्षलागवडीसाठी तात्पुरते खड्डे!
पिंजर : भेंडी काझी रस्त्याच्या कडेला सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र, त्यासाठी एक ते दोन फूट खड्डा खोदण्याची गरज होती, परंतु वनीकरण विभागाने केवळ चार बोटे आत जातील. एवढेच खड्डे खोदल्याचे दिसून आले. त्यातही कुंपणाची व्यवस्था केल्याचे दिसत नाही. त्यामुळे लावलेले वृक्ष जगतील तरी कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तात्पुरते खड्डे खोदू वृक्षारोपण करण्यात आले, परंतु झाडांचे संवर्धन, संगोपन होईल. अशी व्यवस्था मात्र वनीकरण विभागाने केली नाही. वृक्षारोपणावर केवळ खर्च करण्यात येत आहे. संवर्धनाकडे वनीकरण विभाग दुर्लक्ष करीत आहे.
- नंदकिशोर गिलबिले, नागरिक, भेंडी
पिंजर, भेंडी सूत्रक, खेरडा भागाई रस्त्यावर ४०० झाडे लावली. काही दिवसांत कुंपण घालून वृक्षसंवर्धनाचे काम करण्यात येईल.
- रवि तायडे वनपाल, सामाजिक वनीकरण विभाग, बार्शीटाकळी